चारित्र्य पडताळणी.. वॉन्टेडची पोलिस ठाणे वारी
By admin | Published: October 24, 2016 12:58 AM2016-10-24T00:58:35+5:302016-10-24T00:58:35+5:30
निवडणुकीचा असाही फायदा : पोलिसांचे काम झाले हलके; अनेक संशयितांची शरणागती
सातारा : अनेक वर्षांपासून विविध गुन्हे दाखल असलेल्या तसेच पोलिसांना हवे असलेल्या संशयित व्यक्ती पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांपुढे शरणागती पत्करत आहेत. गुन्हे दाखल असलेल्या इच्छुक उमेदवारांना चारित्र्याचा दाखला नेण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे लागत असल्याने पोलिसांचे काम आपसूकच हलके झाले आहे.
काही दिवसांपासून पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारीचा अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे जुळवाजुळव करताना अनेकांच्या नाकीनऊ येते. जातपडताळणी आणि चारित्र्य पडताळणीचा दाखला ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जातपडताळणीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ही प्रक्रिया किचकट आहे. कोल्हापूर येथून दोन ते तीन महिन्यांनंतर जातपडताळणीचे दाखले मिळणार आहेत. तोपर्यंत उमेदवारी अर्जासोबत केवळ अर्ज केलेल्याची पावती जोडावी
लागणार आहे. मात्र, सहा
महिन्यांच्या आत जातपडताळणीचा दाखला जोडला नाही तर संबंधित उमेदवार अपात्र ठरला जाणार
आहे. परंतु चारित्र्य पडताळणीच्या दाखल्यासाठी इच्छुक उमेदवारांना स्वत: पोलिस ठाण्यात जावे लागत आहे. त्यामुळे गेले कित्येक वर्षे पोलिसांसाठी वॉन्टेड असणाऱ्या भल्याभल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. अनेकांच्या नावावर वॉरंट आहेत. तर काहीजण गुन्ह्यांमध्ये साक्षीदार आहेत; परंतु गेली कित्येक वर्षे हे लोक पोलिस ठाण्यात फिरकलेही नाहीत. त्यामुळे या निमित्ताने का होईना हे लोक पोलिस ठाण्यात येत आहेत. हीच संधी साधून पोलिसांनी कोणाला अटक तर कोणाला साक्षीदार तर कोणाला रोज हजेरीसाठी येण्याचे सांगितले आहे.
गुन्हा दाखल असला तरी निवडणूक लढविता येते; मात्र चारित्र्य पडताळणी करणे सक्तीचे असते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार यानिमित्ताने पोलिस ठाण्याची पायरी चढत आहेत.
पोलिसांशी लागेबंधे असले तरी यातून कोणाचीही सुटका होत नाही. हा दाखला घेताना संबंधिताला अधिकाऱ्यांसमोर उभे केले जाते. (प्रतिनिधी)
मोहिते की आहेरराव?
वॉर्ड क्रमांक १५ मध्ये उमेदवारीसाठी अत्यंत चुरशीचे चित्र दिसून येऊ लागले आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आपला हक्क सांगितला आहे. त्याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक प्रशांत आहेरराव यांचेही नाव सातारा विकास आघाडीकडून चर्चिले जात आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून आहेरराव यांच्या घराण्याचे राजघराण्याशी निकटचे संबंध असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा वॉर्ड ‘साविआ’ला सुटणार, असे वातावरण तयार झाले असून, आहेरराव यांनी अंतर्गत प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. दरम्यान, या ठिकाणी भाजपातर्फे सागर पावशे यांनीही चांगला जोर लावला आहे.