'जय श्रीरामा'च्या जयघोषात चाफळमध्ये रथोत्सव संपन्न, रामभक्तांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:17 PM2022-04-12T14:17:25+5:302022-04-12T14:21:26+5:30

नवमी, दशमी व एकादशी हे तीन मुख्य दिवस या उत्सवाचे मानले जातात. चैत्र शुध्द एकादशीला रथोत्सव साजरा करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.

Chariot festival held in Chafal in the name of Jai Shriram | 'जय श्रीरामा'च्या जयघोषात चाफळमध्ये रथोत्सव संपन्न, रामभक्तांची मोठी गर्दी

'जय श्रीरामा'च्या जयघोषात चाफळमध्ये रथोत्सव संपन्न, रामभक्तांची मोठी गर्दी

Next

हणमंत यादव

चाफळ : 'प्रभू रामचंद्र की जय , सत सत सिता राम की जय, बोल बजरंग बली की जय'च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या सासन काठ्यांच्या साक्षीने चाफळला श्रीराम नवमी उत्सवातील श्रीरामाचा रथोत्सव आज, मंगळवारी सूर्योदयाबरोबर अभूतपूर्व वातावरणात संपन्न झाला.

समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८ पासून सुरु केलेला श्रीरामनवमीचा उत्सव साडेतीनशेहून अधिक काळापासुन आजही अखंडितपणे तिर्थक्षेत्र चाफळ येथे सुरु आहे. यावर्षीचा हा ३७५ वा रामनवमी उत्सव आहे. चैत्र शुध्द प्रतिपदा गुढी पाडव्यापासुन ते एकादशी पर्यंत हा उत्सव तब्बल दहा दिवस अभूतपूर्व वातावरणात साजरा केला जातो. नवमी, दशमी व एकादशी हे तीन मुख्य दिवस या उत्सवाचे मानले जातात. चैत्र शुध्द एकादशीला रथोत्सव साजरा करुन या उत्सवाची सांगता करण्यात येते.

आज, मंगळवारी पहाटे काकड आरती होऊन समर्थ वंशज गादिचे मानकरी दुर्गाप्रसाद आयोध्यानाथ स्वामींच्या हस्ते श्रीरामाची महापुजा करण्यात आली. यानंतर चांदीच्या पालखीतुन श्रीरामाची पट्टाभिषिक मूर्ती वाजत- गाजत शेकडो मशालींच्या साक्षीने मंदिरास प्रदक्षिणा घालून रथाकडे आणण्यात आली. यावेळी समर्थ वंशज गादिचे मानकरी दुर्गाप्रसाद आयोध्यानाथ स्वामींच्या हस्ते रथाच्या चारी चाकावर नारळ फोडण्यात आले. दरम्यान बारा बलूतेदार व रथाचे मानकरी साळुंखे बंधूंना मानपानाचे नारळ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ' सत सत सिताराम की जय ' चा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली.

रथासमोर चांदीची पालखी, सुवासिक फुलांनी सजवलेली अबदागिरी, मानाच्या सासन काठ्या, सजवलेले घोडे, शेकडो मशाली, समर्थ वंशज तसेच उत्सवाचे मानकरी आणी हजारो रामभक्त प्रभू रामाचा जयघोष करत रथ ओढत होते. मंदिरापासुन निघालेला रथ सकाळी सुर्योदयावेळी बसथानकाजवळिल कालेश्वर मारुती मंदिराजवळ पोहचल्यानंतर मंदिरास प्रदक्षणा घालून विधी उरकुन परत पुन्हा रथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला. रथोत्सवासाठी सकाळपासुनच मंदिर परिसरात रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

डोळेगांव, निनाम पाडळी, अंगापूर येथील मानाच्या सासनकाठ्या या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. त्यांचाही मानपान देवून सत्कार करण्यात आला. श्रीरामाची पालखी सनई वाद्याच्या गजरात मंदिराच्या मुख्य दरवाजवळ आल्यानंतर दहिभात व नारळाचा नैवेद्य देण्यात आला. यावेळी उपस्थित महिला सुवासिनींनी पंचारती ओवाळून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Chariot festival held in Chafal in the name of Jai Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.