मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सेवागिरी महाराजांचा रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:37+5:302021-01-13T05:43:37+5:30

पुसेगाव : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक ...

Chariot festival of Sevagiri Maharaj in the presence of few people | मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सेवागिरी महाराजांचा रथोत्सव

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सेवागिरी महाराजांचा रथोत्सव

Next

पुसेगाव : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापर प्रथेनुसार आणि रूढीपरंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधी, पूजा कार्यक्रम हे मठाधिपती, पुजारी व विश्वस्तांनी पार पाडले. श्री सेवागिरी महाराजांचा फोटो व पादुका रथात ठेवण्यात आल्या. जमावबंदी असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत रथपूजन करण्यात आले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व त्यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, तलाठी गणेश बोबडे उपस्थित होते.

दर्शनासाठी मंदिरात कोणालाही सोडण्यात आले नाही. दरम्यान, पुसेगावमधील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा सोडून दिवसभर बंद होती.

मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस. या दिवशी सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला व नोटांच्या माळांनी फुललेला रथ गावातून फिरविण्यात येतो. संपूर्ण गावातून रथाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम असतो. मात्र, यंदा रथ मिरवणूकच रद्द केल्यामुळे रथपूजनाचा कार्यक्रम होताच रथ ओढणाऱ्या मानकऱ्यांनी प्रवेशद्वाराच्या आतच परंपरेनुसार झेंड्यापर्यंत मंदिर परिसरात रथ ओढला व पूर्ववत जागेवर आणून ठेवला. गावाला प्रदक्षिणा घालण्याची रथोत्सवाची परंपरा प्रथमच खंडित झाली, तसेच मंगळवारी दिवसभर भाविकांना रथ व समाधीच्या दर्शनास मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, रथ व समाधीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. यंदा तब्बल ७२ वर्षांनी कोरोनाच्या साथीमुळे रथ मिरवणुकीसह यात्रेतही खंड पडला आहे.

चौकट..

सुवर्णमंडित समाधी, रथाच्या लाइव्ह दर्शनाचा आनंद!

पुसेगाव शहर, मंदिराला जोडले गेलेले सर्व रस्ते बॅरिकेडस्‌ लावून पोलीस प्रशासनाने बंद केले होते. परगावातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला गेला नाही. गावातील नागरिकांनाही रस्त्यावर फिरकू दिले नाही. मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी घरीच श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती करून मनोभावे स्मरण करून फेसबुक लाइव्ह व यू-ट्यूबच्या माध्यमातून सुवर्णमंडित समाधी व रथाच्या दर्शनाचा आनंद घेतला.

१२ पुसेगाव

फोटो : पुसेगाव (ता. खटाव) रथपूजनप्रसंगी रामचंद्र शिंदे, सुवर्णा शिंदे, गणेश केंद्रे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, मोहनराव जाधव, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Chariot festival of Sevagiri Maharaj in the presence of few people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.