भारत संकल्प यात्रेचा रथ सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी अडवला, चार जण ताब्यात
By दीपक देशमुख | Published: December 22, 2023 07:12 PM2023-12-22T19:12:07+5:302023-12-22T19:12:55+5:30
योजनांमधील व्यक्तिगत श्रेयवादाबाबत नाराजी
सातारा : शासकीय योजनांचा प्रचार करताना सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची कोणतीही संधी सोडत नाही. काही ठिकाणी योजनांचे स्वागत होते तर काहीठिकाणी योजनांमधील व्यक्तिगत श्रेयवादाबाबत नाराजी व्यक्त होते. याचीच प्रचिती जिल्ह्यात ठिकठिकाणी येत आहे. कोरेगाव तालुक्यातील दुघी गावात ग्रामस्थांनी भारत संकल्प यात्रेचा रथ अडवत मोदी यांच्या नावालाच आक्षेप घेतला. दरम्यान, वरकुटे-मलवडी येथेही रथ अडवल्याप्रकरणी चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित केली आहे. यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. कोरेगाव तालुक्यात गुरुवारी हा चित्ररथ दुघी गावात आला. रथाचे सारथ्य सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांच्याकडे होते. क्षीरसागर केंद्र शासनाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देत असतानाच काही ग्रामस्थांनी रथ अडवला.
केंद्र सरकारची योजना असताना त्यावर व्यक्तिगत नावे कशाला असा सवाल त्यांनी केला. क्षीरसागर यांनी रथ अडवू नका, तुमची जी तक्रार असेल ती लेखी स्वरुपात द्या असे सांगितले. त्यावर ग्रामस्थांनी तुम्ही रथ येणार असल्याचे ग्रामपंचायतीला लेखी दिले काय, ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना फळ्यावर येवून का माहिती दिली नाही असा प्रतिसवाल केला. तसेच योजनेला विरोध नाही, परंतु, रथावर फक्त भारत सरकार लिहावे. आमचा विरोध मोदी यांच्या नावाला असल्याचे सांगितले.
यशेंद्र क्षीरसागर यांनी शासनाच्या आदेशानुसार आलो आहोत. तुमची तक्रार प्रशासनाकडे पाहोचवू, पण तुर्तास योजनांची माहिती सांगू द्या, अशी विनंती केली. परंतु, ग्रामस्थांनी योजनांची माहिती 'भारत सरकार' म्हणून द्या, जाहिरातबाजी करू नका. रथावरील 'मोदी सरकारची हमी नाव' हे नाव झाका, असे सांगितले. या प्रकारामुळे काही काळ वातावरण तंग झाल होते.