चर्मकार मी ‘या जन्मीचा’ तुटक्या चपलांना टाके
By admin | Published: September 30, 2015 10:11 PM2015-09-30T22:11:27+5:302015-10-01T00:30:34+5:30
संसारासाठी उतारवयातही चिकाटी
अरुण पवार -- पाटण --१९५० मध्ये म्हणजेच वयाच्या १७ व्या वर्षी गिरगाव, मुंबई येथे जाऊन फूटपाथवर चर्मकाराचा व्यवसाय करणाऱ्या नाटोशी, ता. पाटण येथील रामचंद्र बंडू मोरे या ज्येष्ठ नागरिकाची वयाच्या ७० व्या वर्षीही काहीतरी करून दाखविण्याची धडपड आजही सुरू आहे. तीन मुले कर्ती सवरती असून, स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी आहेत. तरीसुद्धा रामचंद्र मोरे यांना वार्धक्यातही स्वत:ला मन स्वस्थ बसू देत नाही.
रामचंद्र मोरे यांना पाटणच्या सहृदय ज्येष्ठ नागरिक संघाचे पोस्टकार्ड आले आहे. यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपला सत्कार केडर कार्यालय पाटण येथे होणार आहे, असा उल्लेख आहे. त्या निमित्ताने बोलताना रामचंद्र मोरे म्हणाले की, ‘मी वयाच्या १७ व्या वर्षांपासून माझा जन्मजात असलेला चांभार व्यवसाय करत आलोय. मुंबईला वीस वर्षे राहून हा व्यवसाय केलाय. १९७१ मध्ये माझे लग्न झाल्यानंतर मी नाटोशी या गावीच राहिलो. येथे राहून गावकीचे काम केले, छत्र्या दुरुस्त करायचो त्यावेळी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. तशा अवस्थेत मुलांचा सांभाळ केला. संजय, राजेंद्र, दत्तात्रय या तीन मुलांचे बालपणदेखील गरिबीतच गेले.
त्यामुळे मला भूतकाळाची जाण आहे, ती विसरणार नाही. आजही मुले चांगली कमाविणारी झाली. झोपडीत राहत होतो, आता बंगल्यात राहतोय.’ मुलं म्हणतात की, ‘आई-वडिलांनी आता बसून राहायचं.’ पण, माझे मन स्वस्थ बसू देत नाही.’ वयाच्या सत्तरीतसुद्धा मी सतत व्यवसायात मग्न असतो. थोरल्या मुलाचे मोरगिरी येथे फूटवेअरचे दुकान आहे. तिथे जाऊन मी चपलांना टाके मारून देणे किंवा इतर कामे करतो. जोपर्यंत हातपाय धड आहेत, तोपर्यंत मी काम करणारच.’
गुरुवारच्या
बाजारात
दुकान मांडतो
रामचंद्र मोरे व त्यांची पत्नी हे दोघेजण उतार वयातही मोरगिरी येथील आठवडा बाजारात चप्पल विक्रीचे दुकान मांडून व्यवसाय करतात.