मोक्कातील फरारीला पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:36 AM2021-04-26T04:36:32+5:302021-04-26T04:36:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाल्यानंतर फरार झालेला किरण आबा मदने (रा. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाल्यानंतर फरार झालेला किरण आबा मदने (रा. जरांब वस्ती, राजापूर, ता. खटाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन किलोमीटर पाठलाग करुन जेरबंद केले.
मदने याच्यावर शिरवळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, तो गुंड योगेश मदने याच्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत सातारा गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील राजापूर येथील योगेश मदने याच्यावर शिरवळ, फलटण ग्रामीण, दहिवडी पोलीस ठाण्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, प्रेमी युगलांना मारहाण करून लुटमार करण्याचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच या टोळीने लुटमारीचा प्रकार केला होता. दरम्यान, या टोळीवरील वाढते गुन्हे लक्षात घेता, टोळीप्रमुख योगेश मदने आणि त्यातील सदस्यांवर पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली होती. मात्र, यातील एक सदस्य किरण मदने हा फरार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, तो ताथवडा घाट परिसरात असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे आणि त्यांच्या टीमने ताथवडा घाट येथे रविवारी सापळा लावला. किरण मदने ताथवडे घाटाच्या कठड्यालगत असणाऱ्या एका झाडाखाली लपून बसला होता. पोलिसांना त्याला ओळखल्यानंतर त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. यावेळी पोलीस त्याच्या दिशेने जात असताना तो पळून गेला. यानंतर पोलिसांना त्याचा पाठलाग सुरु केला. जवळपास दोन किलोमीटर पाठलाग करुन त्याला एलसीबीने अटक केली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, मोहन नाचण, शरद बेबले, साबीर मुल्ला, राजकुमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमित सपकाळ, केतन शिंदे, प्रवीण फडतरे, रोहित निकम सहभागी झाले होते.