‘चॅवम्यँव’ मांज्यांनी काटली पतंगाची दोरी !
By admin | Published: October 17, 2016 12:43 AM2016-10-17T00:43:29+5:302016-10-17T00:43:29+5:30
चायना बनावटीला बंदी : काचा कुटून मांजा तयार करण्याकडे युवकांची पाठ
जावेद खान ल्ल सातारा
‘चायना मेड’ वस्तूंनी प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. त्यातून पतंगाचा मांज्याही सुटलेला नाही; पण या मांज्याने जिल्ह्यातील दोघांचा बळी घेतला. जिल्ह्यात अनेक तरुण जखमी झाले अन् या मांज्यावर बंदी आली. बंदी घातल्याने ‘चॅवम्यँव’ चायना मांजा बाजारातून हद्दपार झाला; पण जाता-जाता त्याने पतंगाची दोरीही काटली.
जिल्ह्यातील बहुतांश भागात या दिवसात पतंग मोठ्या प्रमाणावर उडविले जातात. पतंग उडविण्यात तो सर्वात उंच उडविण्याचा जेवढा आनंद होतो, त्यापेक्षा सर्वाधिक आनंद दुसऱ्याचा पतंग काटण्यात येतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपलाच मांजा धारदार व दणकट व्हावा, याकडे तरुणाईचे लक्ष असायचे.
एक-दोन पिढ्यांपूर्वी पतंग उडविण्यासाठी मांजा घरीच बनविला जात होता. रात्रभर जागून मांजा बनविला जात होता. बाटल्या, ट्यूबलाईटच्या काचा कुटून त्या डिंकात मिसळून, उकळून दोरीवर त्याचा थर दिला जात असायचा.
बदलत्या काळानुसार कष्ट करण्यापेक्षा तयार मांजा वापरण्याकडे कल वाढला. हाच बदल स्वीकारून चायना बनावटीचा ‘चॅवम्यँव मांजा’ बाजारात आला. परंतु या मांजाची धार एवढी तीव्र की पतंगाची दोरी सोडाच अनेकांचे गळे कापले. जिल्ह्यातील दोघांना जीव गमवावा लागला. या मांज्यावर बंदी आणण्यासंदर्भात समाजातून चर्चा होऊ लागल्या अन् व्यवसायांना त्याचा आदर करावा लागला.
पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई यांनी १८ जून २०१६ रोजी कलम ५ अंतर्गत अधिसूचना जारी करून नायलॉन मांज्यावर बंदी आणली.
चायना मांजा अविघटनशील असून तो माती, पाण्यात कुजत नाही. जनावरे, पक्षी, माणसांच्या आरोग्यासाठी तो धोकादायक ठरत आहे. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे साताऱ्यातील घाऊक व्यापारी व व्यावसायिकांनी चायना मांजा विकणे पूर्णपणे बंद केले.
चायना मांजा हा नॉयलॉनपासून बनविलेला असायचा; त्यामुळे तो सहजासहजी तुटत नाही. काटाकाटीलाही चांगला असल्याने डाव रंगात यायचा. त्यामुळे तरुणाईकडे याकडे आकर्षित झाली; परंतु तो सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे पतंग उडविण्याचे प्रमाण
सत्तर टक्के घटले आहे. दरवर्षी पतंगाच्या रुपाने लाखोंची उलाढाल होत असायची; परंतु यंदा ही उलाढाल कमालीची घटली आहे. चायना मांज्याचा अनेकजण आग्रह धरत असल्याचे काही व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
छुप्या पद्धतीने विक्री सुरूच
नायलॉन मांजा बाजारात उपलब्ध नसला तरी शहरातील काही ठिकाणी लपून छपून विक्री सुरूच आहे. यासाठी दुप्पट किंमत मोजण्याची तयारी तरुण दाखवत आहेत. या विक्रेत्यांवर वेळीच आवर घालावा, अशी मागणी होत आहे.
लाखोंची उड्डाणे मंदावली
४पतंग उडविणे हा एक छंद आहेत. पण काही राज्यात पतंग महोत्सव भरविला जातो. यामध्ये लहानांपासून मोठी मंडळीही सहभागी होतात.
४विशेषत: मकरसंक्रांत तर काही भागात सप्टेंबरपासून पतंग खेळला जातो. या काळात लाखोंची उलाढाल होते. परंतु मांजा बाजारात नसल्याने ही उड्डाणे मंदावली आहेत.
चायना मांजा विकणे आम्हीही बंद केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासून तरुणांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पतंग उडविणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. तरीही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून विक्री बंदच केली आहे. पर्याय म्हणून हळूहळू कॉटन मांजा बाजारात येत आहेत. त्याकडे तरुण वळतील, अशी खात्री वाटते.
- आयाज मोमीन,
पतंग व्यावसायिक.