जन्मदात्या आईची मुलाकडूनच फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:35+5:302021-02-25T04:54:35+5:30
कोरेगाव : शहरातील आरफळ कॉलनी परिसरात असलेले राहते घर आणि मोकळ्या जागेचे खोटे बक्षीसपत्र तयार करून, त्याद्वारे परस्पररीत्या त्याची ...
कोरेगाव : शहरातील आरफळ कॉलनी परिसरात असलेले राहते घर आणि मोकळ्या
जागेचे खोटे बक्षीसपत्र तयार करून, त्याद्वारे परस्पररीत्या त्याची
विक्री केल्याप्रकरणी स्वत:च्या मुलाच्या विरुद्ध जन्मदात्या आईने तक्रार
नोंदविली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंद
करण्यात आला आहे.
वर्धनगड, ता. खटाव येथील मूळ रहिवासी असलेल्या राबिया बालेखान भालदार (वय ७८) या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या टांकसाळीतून निवृत्त झालेल्या आहेत. त्या
कल्याण (ठाणे) येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असून, त्यांनी नोकरीच्या
कालावधीत कोरेगावच्या आरफळ कॉलनी परिसरात दोन गुंठे मोकळी जागा खरेदी
करून, तेथे छोटे घर व दुकान गाळा बांधला होता. त्या दरवर्षी न चुकता
फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायत कार्यालयात जाऊन मिळकतकर जमा करतात. २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन होण्यापूर्वी त्यांनी मिळकतकर जमा केला होता.
त्यानंतर, लॉकडाऊनकाळात त्या कल्याण येथे अडकून पडल्या होत्या. दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्या नातू मोहसीन भालदार याच्यासमवेत
नगरपंचायत कार्यालयात आल्या व मिळकतकर जमा करून घेण्यास सांगितले.
त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने मिळकतकर यापूर्वीच जमा करण्यात आला
असल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत चौकशी केल्यावर नगरपंचायत रेकॉर्डवरून त्यांचे नाव कमी होऊन धाकटा मुलगा मोहम्मद बालेखान भालदार यांच्या नावाची
नोंद झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तेथे असलेल्या तलाठी
कार्यालयात याबाबत चौकशी केली असता, तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे
बक्षीसपत्र करून दिले असल्याने तुमचे नाव रेकॉर्डवरून कमी झाले आहे.
याबाबत तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी करा, असे सांगण्यात
आले. दुय्यम निबंधक कार्यालयात कोणतेही बक्षीसपत्र नोंद झाले नसल्याचे
सांगण्यात आले. मात्र, दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी रामदास पोपट बुधावले यास रजिस्टर्ड दस्ताने मोहम्मद भालदार याने संबंधित मिळकत विक्री केले
असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, संबंधित मिळकतीचे फेरफार काढून पाहिले
असता, मोहम्मद भालदार याने पत्नी यास्मिन हिच्यासमवेत संगनमत करून खोटे
रेकॉर्ड तयार करून परस्पररीत्या मिळकतीची विक्री केली असल्याचे निदर्शनास
आले.
याप्रकरणी राबिया भालदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद भालदार
याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.