अबबऽऽऽ ४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:59+5:302021-02-05T09:06:59+5:30

शिरवळ : शिरवळमध्ये मोठी घरफोडी झाली. पण कोठेच मोबाईलचा वापर झाला नाही. धागेदोरे नसताना आंतरराज्य टोळीचा छडा लावताना शिरवळ ...

Check out 496 CCTV cameras | अबबऽऽऽ ४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

अबबऽऽऽ ४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

Next

शिरवळ : शिरवळमध्ये मोठी घरफोडी झाली. पण कोठेच मोबाईलचा वापर झाला नाही. धागेदोरे नसताना आंतरराज्य टोळीचा छडा लावताना शिरवळ पोलिसांनी सात दिवसात बाराशे किलोमीटरचा प्रवास केला. यात राजकोट ते गोवा महामार्गावर तब्बल ४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत टोळीचा छडा लावला. यासाठी सिंधुदुर्ग-गोवा सरहद्दीवर दुकानदाराची भूमिका घेत ऑन ड्युटी १६८ तास पहारा दिला.

शिरवळ हद्दीत महामार्गालगत अशोक गाजरे यांच्या घराची कडी उघडून चोरट्यांनी गुरुवार, दि. २१ रोजी भरदिवसा घरामधील कपाटातून रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी घटनास्थळी मोबाईलचा वापर केलेला नसल्याने व कोणताही सुगावा न ठेवल्याने शिरवळ पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते.

यावेळी हे आव्हान स्वीकारत फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर दोन पथके तयार केली. पथकाला लागणाऱ्या तांत्रिक व इतर कागदपत्रांची माहिती पुरविण्याचे काम काही सहकाऱ्यांनी सांभाळत युद्धाची तयारी केली.

पोलिसांच्या पथकाने गुजरामधील राजकोट तसेच शिरवळ, खेड-शिवापूर, पुणे-मुंबई महामार्गावरील टोलनाक्यावरील तसेच मुंबई, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, आंबोली घाट मार्गे गोवा याठिकाणी असणाऱ्या विविध ठिकाणच्या तब्बल ४९६ सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यानंतर एक अस्पस्ट चित्र व एका प्रत्यक्षदर्शीने गाडीचा केलेला उल्लेख, तसेच एका खबऱ्याने दिलेल्या जुजबी माहितीच्या आधारे पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत, तसेच मुंबई येथील मालाड, चेंबूर पोलीस ठाणे हद्दीमधील बसथांबे, पार्किंगच्या जागा, सलग चार दिवस तपासणी करत शोधमोहीम राबविली.

यावेळी संबंधित चोरट्यांनी नवीन सीमकार्डचा वापर सुरू केला असल्याने त्यांना शोधणे अवघड बनल्याने, तपासात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. संबंधित चोरट्यांच्या मुंबई येथील रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर शिरवळ पोलीसही अवाक्‌ झाले. संबंधितांवर मुंबई येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये चाळीसहून अधिक गुन्हे दाखल असून, संबंधितांची उच्चभ्रू वसाहतीमध्ये सदनिका असल्याचे निष्पन्न झाले. चोरटे हे मौजमजा व व्यवसाय म्हणून घरफोड्यांसारखे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी मोर्चा चोरट्यांच्या मागावर वळविला.

संबंधित चोरटे गोव्याला फिरण्याकरिता कारने गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोवा येथे तसेच बांदा व आंबोली येथील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, संबंधित वाहन हे गोवाच्या बाजूने गेल्याचे निष्पन्न झाले. यावेळी गोवा-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर शिरवळ पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग व स्थानिक पोलीस, उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मोक्याच्या ठिकाणी गोव्यावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याकरिता पथक निर्माण केले.

सलग तीन दिवस-रात्र पहारा दिला असता, गोव्यावरून मौजमजा करत परतणाऱ्या रॉनी जोसेफ फर्नांडिस ऊर्फ साहिल सलीम खान (वय ३२, रा. मालाड वेस्ट, मुंबई), अब्दुल हमीद रशीद शेख (३३), अब्दुल्ला जमीरउल्ला पठाण (३७), सुजित भगवान कांबळे (२८, तिघे रा. मानखुर्द, मुंबई) यांना मोठ्या शिताफीने पकडले. यामुळे शिरवळ व भुईंज हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले. मुख्य संशयित संजय रत्नेश कांबळे ऊर्फ सलीम ऊर्फ कुबड्या अब्दुल लतीफ शेख (रा. दिवा, जि. ठाणे) हा फरार असून शिरवळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चौकट

पोलिसी तपासाचा अभ्यास

आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार सराईत असून संबंधितांनी पोलिसी तपास पद्धतीचा अर्थात कायद्याचा चांगलाच अभ्यास केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली पद्धत पाहिली असता, यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

०२शिरवळ पोलीस

शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आंतरराज्य टोळी गजाआड केली आहे.

Web Title: Check out 496 CCTV cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.