जनावरांची तपासणी सुरू
By admin | Published: February 2, 2015 09:37 PM2015-02-02T21:37:47+5:302015-02-02T23:57:58+5:30
पशुधन विभागाच्यावतीने ढाकणीत लसीकरण मोहीम
म्हसवड : ‘दुष्काळातून वाचली; त्यांना कुत्री चावली’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. ‘लोकमत’च्या या दणक्यामुळे पशुधन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येऊन ढाकणी, ता. माण येथील शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी तालुका पशुधन विकास अधिकारी व पथकाने करून लसीकरण मोहीम हाती घेतल्याने ढाकणी येथील पशुधनाचे जीव वाचणार असल्याने शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. शनिवार, दि. ३१ जानेवारीच्या अंकात दुष्काळातून वाचली; त्यांना कुत्री चावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. ढाकणी येथील श्ोतकऱ्यांची अनेक जनावरे दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. जनावरे दगावण्यास सुरुवात झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांनी वडजल पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना सर्व घटनेची माहिती दिली. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत ठरावही केला, तरी पशुधन विभागाने दुर्लक्ष केल्याने जनावरे दगावण्याचे सुरूच होते; परंतु शनिवारच्या ‘लोकमत’च्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली. पशुधन विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन तालुका पशुधन अधिकारी डॉ. मनीषा नेटके व अन्य दहा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारीच ढाकणी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी केली. त्यानंतर दगावलेली जनावरे पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे दगावली असल्याचा निष्कर्ष या पथकाने काढला. यानंतर ढाकणी येथील शेतकऱ्यांच्या सुमारे १५०० जनावरांपैकी कुत्रे चावल्याची शक्यता असणाऱ्या जनावरांना रेबीज लस देण्यात आली, तर अन्य जनावरांना घटसर्प लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. धिवार व कर्मचारी लसीकरण करत असून, येत्या दोन दिवसांत लसीकरण पूर्ण होणार आहे. (वार्ताहर)
‘लोकमत’च्या वृत्तामुळे आमच्या लाखमोलाच्या पशुधनाचे प्राण वाचण्यास मदत झाली. त्यामुळे मी ग्रामस्थांच्या वतीने ‘लोकमत’ला धन्यवाद देत आहे.
- प्रकाश ओंबासे, ग्रामस्थ ढाकणी