अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉटस् अॅप’ वर धनादेश!
By admin | Published: March 30, 2016 10:27 PM2016-03-30T22:27:44+5:302016-03-31T00:01:55+5:30
कारवाईचा घेतला धसका : तीन महिन्यांत सुमारे दीड हजार चेकने व्यवहार; थकबाकीची रक्कम भरण्यासाठी एकच दिवस अवधी
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेकडून केलेल्या कारवाईची शहरातील काही बढ्या आणि व्यापारी थकबाकीधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. कारवाईसाठी आलेल्या वसुली पथकातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरील व्हॉटस् अॅपवर थकबाकीदारांनी चक्क पैसे भरलेले चेक व डी डीचे फोटोच पाठवले आहेत. या तीन महिन्यांत पन्नास हून अधिक जणांनी वॉटस्वर चेक पाठविले असून, एकूण दीड हजार चेकद्वारे थकबाकीची रक्कम भरण्याचे व्यवहार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
कऱ्हाड पालिकेतील वसुली विभागाकडून शहरातील सात प्रभागांतील ६ हजार १६६ थकबाकीधारकांवर गेल्या तीन महिन्यांपासून कडक स्वरूपात कारवाई केली आहे. आत्तापर्यंत निम्म्यांहून अधिक थकबाकीधारकांनी जरी आपली रक्कम भरली आहे. मात्र, वसुली विभागाकडून चाळीस हून अधिक नळकनेक्शन तोडून तसेच वीस हून अधिक दुकानगाळ्यांना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली.
कऱ्हाड शहरात पालिकेच्या संकलित कर थकविणाऱ्यांमध्ये समाविष्ट असलेल्या शासकीय कार्यालयांनी देखील अद्याप रक्कम भरलेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील इतर थकबाकी नागरिकांप्रमाणे शासकीय कार्यालयांचेही नळकनेक्शन तोडले जाणार आहे. मागील २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षांतील थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आता एकच दिवस अवधी उरला आहे. त्यानंतर चालू वर्षातील थकबाकी रक्कमेसह नव्याने व्याजासह कर आकारणी केली जाणार आहे. पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्निशामक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांचा उपयोग करणाऱ्या शासकीय कार्यालयांकडून कोटींहून अधिक थकबाकीची रक्कम जमा होणे बाकी आहे. त्यांनाही पालिकेच्या वतीने नुकत्याच नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
पालिकेच्या वसुली मोहिमे दरम्यान मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी वर्षभर पालिकेच्या सुविधा उपभोगणाऱ्या नागरिकांकडून कर भरण्यास विलंब लावला जात असल्याने त्यांच्यावर कडक स्वरूपात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. परिणामी थकबाकीधारकांची नावे ही फलकांवर टाकून त्यांच्या घरापुढे बँडपथकही वाजविले जात आहे. त्यामुळे थकबाकीधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)
फलकावरील व्यावसायिक व व्यापारीही पालिकेत
घरगुती थकबाकीदारांसह शासकीय कार्यालयाचीही नावे फलकावर टाकण्याचा निर्णय घेतला. व थकबाकीधारकांची नावे फलकावर टाकून ती पेठांपेठांमध्ये लावल्यामुळे फलकावर झळकलेल्या थकबाकीदारांनी तत्काळ पालिकेतील वसुली विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पैसे भरले.
दहा मोबाईल कंपनी टॉवर मालकांनी भरली रक्कम
कऱ्हाड पालिकेच्या वसुली विभागाकडून महिनाभरात पाच मोबाईल टॉवरला सील ठोकण्यात आले. त्यामुळे टॉवर बंद असल्याने त्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. वसुली पथकाच्या कारवाईचा धसका घेत शहरातील दहा खासगी मोबाईल कंपनी टॉवर मालकांनी पालिकेत येऊन लाखांहून अधिक थकबाकीची रक्कम भरली.
थकबाकीदारांकडून पालिकेची गेल्या दोन वर्षांपासून ते आत्तापर्यंत संकलित कराची रक्कम थकविणाऱ्यांना वारंवार नोटिसा दिल्यात जात होत्या. तसेच प्रत्यक्ष वसुली अधिकारीही त्यांच्याकडे हेलपाटे घालत होते. तरीही थकबाकीदारांकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर शेवटी पालिकेने जालीम उपाय शोधून काढला. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चक्क बँडपथकासह थकबाकीदारांच्या दारात जाऊन गाणे वाजवून वसुली मागायला सुरुवात केल्याने याची धास्ती घेत थकबाकीदारांनी तत्काळ आपली रक्कम पालिकेत जमा केली. पालिकेने केलेली बँडबाजाची कारवाई ही शहरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली.