Satara- पुसेसावळी चांगली, मग कशासाठी दंगली?; एकीतूनच साधला गावाने विकास
By संजय पाटील | Published: September 13, 2023 01:34 PM2023-09-13T13:34:13+5:302023-09-13T13:34:33+5:30
पारायणाच्या पंगतीला मुस्लिम समाजाचे जेवण; आक्षेपार्ह पोस्ट, दंगलीमुळे गालबोट
संजय पाटील
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी ही विभागातील गावांची महत्वाची बाजारपेठ. 'सर्वधर्म समभाव' ही या गावाची आजवरची ओळख; पण गावच्या याच लौकिकाला गालबोट लागण्याचा प्रकार घडला. जिथं पारायणात पहिली पंगत मुस्लिम समाजाकडून घातली जाते त्याच पुसेसावळीत दंगल उसळली. हे का घडलं, यापेक्षा हे घडलच कस, याची सल ग्रामस्थांच्या मनात आहे.
पुसेसावळीला १९२२ मध्ये ग्रामपंचायत स्थापन झाली. त्याकाळी गावाचा आवाका जेमतेम होता. मात्र, कालांतराने गावचे रूपडे पालटले. विभागातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून गाव नावारूपाला आले. ग्रामपंचायतीनेही गावात सोयीसुविधा पुरवल्या. त्यामुळे बाजारपेठेच्या विस्ताराला चालना मिळाली. टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायत सक्षम होत गेली आणि त्याचबरोबर गावाच्या विकासाचा आलेखही चढता राहिला.
२००९ मध्ये याच एकीतून ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळवला. तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले. एका बाजूला गाव विकासाच्या उंबरठ्यावर असताना दुसऱ्या बाजूला गावात सलोखा राखण्याचे कामही ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने केले. एकोपा हीच गावाची खरी ओळख बनलेली. मात्र या लौकिकाला काही समाजकंटकांमुळे गालबोट लागले.
जनजीवन पूर्वपदावर येईल पण....
सोशल मीडियावर व्हायरल झालेली आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यानंतर गावात उसळलेली दंगल या दोन्ही गोष्टी गावाच्या विकासाला मारक ठरल्या आहेत. त्याबरोबरच सामाजिक सलोख्यालाही या घटनांमुळे धक्का पोहोचला आहे. काही दिवसात येथील जनजीवन पूर्वपदावर येईल; पण या घटनेमुळे समाजमनाला झालेल्या जखमा भरून येण्यास आणखी बराच कालावधी जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला आणि ग्रामस्थांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे.
पारायणाच्या पंगतीला मुस्लिम समाजाचे जेवण
पुसेसावळीत दर तीन वर्षांनी अधिकमासात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला जातो. कित्येक वर्षाची गावाची ही परंपरा असून ही परंपरा ग्रामस्थांकडून जपली जाते. या सोहळ्यात दीड ते दोन हजार भाविक सहभागी होतात. सलग आठ दिवस त्यांच्याकडून पारायण होते. या सोहळ्यात भाविकांच्या जेवणाची पहिली पंगत मुस्लिम समाजाकडून घातली जाते. हे या गावाचे वैशिष्ट्य. यंदा अधिक मासात काही दिवसांपूर्वीच हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर ही अनपेक्षित घटना घडली आहे.
हजारभर उंबऱ्यांचं गाव
विभागातील इतर गावांपेक्षा पुसेसावळीची लोकसंख्या तुलनेने जास्त आहे. याठिकाणी व्यापारी पेठ असल्यामुळे अनेकजण याचठिकाणी वास्तव्यास आहेत. गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार असून हजारभर कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्याबरोबरच व्यवसाय व कामानिमित्तही अनेकजण येथे वास्तव्यास आहेत.
पुसेसावळीत घडलेली घटना वेदनादायी आहे. गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील असताना गावाच्या लौकिकाला अशा पद्धतीने गालबोट लागेल, असे वाटले नव्हते. मात्र, यापुढे गावात सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी सर्वांना बरोबरीने घेऊन आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. - सुरेखा माळवे, सरपंच
गावात यापूर्वी कधीही अनुचित प्रकार घडला नव्हता. यापुढेही असा प्रकार घडू नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहतील. गावातील शांतता आणि ऐक्य अबाधित राहण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. - डॉ. राजू कदम, उपसरपंच