कवठेच्या बगाड यात्रेत ‘चांगभलं’चा जयघोष

By admin | Published: April 16, 2017 10:45 PM2017-04-16T22:45:49+5:302017-04-16T22:45:49+5:30

राज्यभरातील भाविकांची हजेरी : रथ ओढण्यासाठी बारा बैलांचे बळ; धार्मिक कार्यक्रम उत्साहात

Chembhosh of 'Changbhala' in the yatra | कवठेच्या बगाड यात्रेत ‘चांगभलं’चा जयघोष

कवठेच्या बगाड यात्रेत ‘चांगभलं’चा जयघोष

Next



कवठे : कवठे, ता. वाई येथील यंदाची बगाड यात्रा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’च्या जयघोष, गुलालाची उधळण अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड रथ ओढण्यात आला.
यात्रेच्या आदल्या रात्री १२ वाजता भैरवनाथ मंदिरात कौल लावण्यात आला. सात ग्रामस्थांनी यंदा बगाड्या होण्यासाठी कौल आजमावला. यापैकी रामदास विनायक डेरे यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान डेरे यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण करून पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे ससाणे भावकीच्या बैलामार्फत पोहोचविण्यात आला.
कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून, या अकरा भावकींच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते. यास ‘खुता’ असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो. दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’ या गजरात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आला.
ठराविक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येत होत्या. यामुळे अरिष्ट टळते असे मानले जाते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बगाड यात्रा कवठे गावात येऊन निर्विघ्न पार पडली. खांद्यावरून बगाड्यास भैरवनाथ मंदिरात नेऊन त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. बगाड यात्रेनंतर रात्री छबिन्याच्या कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)
आज प्रेक्षणीय कुस्त्यांचा रंगणार थरार
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दि. १७ रोजी मनोरंजनासाठी काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. चांदीची गदा, मानाच्या ढाली तसेच विविध चार लाखांपर्यंत इनामाच्या कुस्त्यांच्या फडाचे आयोजन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे. महिलांसाठी दि. २९ रोजी सुरेखा पुणेकर यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Chembhosh of 'Changbhala' in the yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.