केमिकलचा टँकर महामार्गावर उलटला
By admin | Published: June 14, 2015 11:50 PM2015-06-14T23:50:50+5:302015-06-14T23:56:22+5:30
कऱ्हाडनजीक अपघात : रस्त्यावरील वाहतूक खोळंबली
कऱ्हाड/मलकापूर : इचलकरंजीहून चिपळूणला केमिकल घेऊन निघालेला टँकर कऱ्हाडनजीकच्या कोल्हापूर नाक्यावर पलटी झाला. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर केमिकल पसरल्याने वाहतूक दुपारपर्यंत उपमार्गावरून वळविण्यात आली होती.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथे पार्वती इंडस्ट्रीज इस्टेट नावाची केमिकल कंपनी आहे. ही कंपनी चिपळूण येथील साबण बनविणाऱ्या कंपनीला सोडीयम सेलिकेट नावाचे केमिकल पुरविण्याचे काम करते. या कंपनीतील टँकरचालक धनाजी यादव (वय २६) हा रविवारी पहाटे केमिकलचा टँकर (एमएच ०९ बीसी १३६५) घेऊन इचलकरंजीहून चिपळूणला जाण्यासाठी निघाला.
केमिकलचा टँकर कऱ्हाडनजीक कोल्हापूर नाका येथे पोहोचला असताना चालकाचा ताबा सुटून टँकर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. टँकर महामार्गावरच पलटी झाला. परिसरातील नागरिक व प्रवाशांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमी चालकाला टँकरमधून बाहेर काढले. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच टँकरच्या टाकीमधून केमिकलला गळती लागली. हे केमिकल संपूर्ण महामार्गावर पसरण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर केमिकल पसरल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. केमिकल पसरत चालल्यामुळे भीतीचे वातावरण निमार्ण झाले होते.
या अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस व महामार्ग देखभालचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून वाहतूक उपमार्गावर वळविली. तसेच पालिकेच्या अग्निशामक पथकालाही अपघातस्थळी पाचारण केले.
अग्निशामकच्या पथकाने रस्त्यावर साचलेले केमिकल पाण्याच्या साह्याने धुऊन काढले.
सकाळी अपघातग्रस्त टँकर महामार्गावरून हटविण्यात आला. तसेच दुपारी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. अपघातात टँकरसह कठड्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)