छगन भुजबळ मोठे नेते; महादेव जानकर म्हणाले, दुसरीकडे राहण्यापेक्षा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:10 IST2025-01-04T13:09:48+5:302025-01-04T13:10:17+5:30
काेणत्याही मित्रपक्षात नसल्याचेही केले स्पष्ट

छगन भुजबळ मोठे नेते; महादेव जानकर म्हणाले, दुसरीकडे राहण्यापेक्षा..
सातारा : ओबीसी समाजात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोठी जागृती केली आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांना सल्ला देणे बरोबर नाही. पण, दुसऱ्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी, घर असणे आवश्यक आहे, असे रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी भुजबळ यांच्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर दिले. तसेच मी कोणत्याही मित्रपक्षात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जानकर बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक परिवर्तनाचे अजोड काम केले आहे. नायगाव येथे अभिवादन करून आम्ही प्रेरणा घेतो.
यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जानकर म्हणाले, भाजप आणि काँग्रेसमध्येही काहीही फरक नाही. त्यामुळे मी महायुती किंवा आघाडीबरोबरही नाही. स्वत:ची ताकद निर्माण करून स्वत:चे राज्य आणणार आहे. एक दिवस फुले विचारांचाच मुख्यमंत्री आम्ही करू. आता दिल्ली आणि बिहार राज्यातही विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात माझा एक आमदार असून, तिघे जण थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत.