छत्रपतींची भवानी तलवार साताऱ्यातच : सावंत
By Admin | Published: October 7, 2014 10:40 PM2014-10-07T22:40:28+5:302014-10-07T23:49:18+5:30
‘लोकमत’ माध्यम प्रायोजक : जयहिंद मंडळातर्फे नवदुर्गांना पुरस्कार प्रदान
सातारा : ‘छत्रपतींच्या वारसांची राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. भवानी तलवारीचे वास्तव्य असल्यामुळे साताऱ्याला विशेष मान आहे. छत्रपती शिवरायांची खरी ‘भवानी’ तलवार साताऱ्याच्या राजघराण्याकडे आहे. ही तलवार ब्रिटिशांनी नेल्याचा कांगावा केला गेला होता. वास्तविक ब्रिटिशांकडे जी तलवार आहे, तिचे नाव ‘जगदंब’ तलवार आहे,’ अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिली.
येथील शनिवार चौकातील जयहिंद मंडळाच्या वतीने सन्मान नवदुर्गांचा अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत सखी मंच’ आहे. प्रारंभी नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘तुळजा’ पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इंदुताई पाटणकर यांना सागर मालपुरे व मालती पाटुकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘जगदंबा’ पुरस्कार शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पत्नी तारा ओंबळे यांना जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्या उपस्थित राहिल्या नसल्यामुळे त्यांचा पुरस्कार सुमन वांकर यांनी विमल धबधबे यांच्या हस्ते स्वीकारला. ‘भवानी’ पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शिका डॉ. शैला दाभोलकर यांना इंदुमती जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी साताऱ्यात प्रथमच इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांचे ‘शिवरायांच्या तीन तलवारी’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना सावंत म्हणाले, ‘शिवछत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या साताऱ्याचे नाव शौर्यपूर्ण गाथेत जोडले गेले आहे. मराठ्यांच्या गौरवपूर्ण इतिहासाचा मोठा ठेवा सातारकरांकडे सुरक्षित आहे. इतिहास कालीन संदर्भ, दगडी शिल्प आणि संग्रहित चित्रांचा आधार घेत शोध घेतला, तर या गोष्टी लगेच लक्षात येतात. जलमंदिरमधील भवानी मंदिरात ठेवण्यात आलेली तलवार आणि संग्रहित चित्रांमध्ये आढळून येणारे वैशिष्ट्ये तीच आहेत. तलवारीच्या नख्या, मूठ, वाटी, बाज, ठेवण पाती जशीच्या तशी असल्यामुळे ही तलवार राजघराण्याकडे असल्याचे सत्य अधोरेखित झाले आहे.’
कार्यक्रमाचे डॉ. राजेंद्र पाटुकले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘साज’ आॅक्रेस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जयहिंद ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सातारकर नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जयहिंद मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर
शनिवार चौकातील जयहिंद मंडळाने सामाजिक कार्यात कायम अग्रेसर सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील पहिले नोंदणीकृत मंडळ होण्याचा मान जयहिंद मंडळाला मिळाला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्वजवंदनासाठी मंडळाने सर्वाधिक उंच ध्वजखांब उंचावून आनंद व्यक्त केला. मंडळाच्या रौप्य महोत्सव वर्षात मंगेशकर कुटुंबीयांच्या मैफिलीचा नजराणा सातारकरांना मिळाला होता. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मंडळाचे आकर्षण आहे. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून प्रदूषणमुक्त दिवाळीची संकल्पनाही मंडळाने मांडली. मंडळाच्या वतीने पारंपरिक दीपोत्सव साजरा करण्यात येतो. महारांगोळी आणि पणत्यांच्या माध्यमातून मंडळाने जागतिक तापमान वाढ, भ्रष्टाचार, कास पठार वाचवा, लेक वाचवा, डॉ. दाभोलकर - व्यर्थ न हो बलिदान, यासारखे विषय हाताळण्यात आले आहेत. मंडळाने शांतता मिरवणूक पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळविले आहेत.