छत्रपती शाहू महाराजांचे संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे, डॉ. भारत पाटणकरांनी केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:17 PM2021-12-31T19:17:47+5:302021-12-31T19:52:22+5:30
या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.
सातारा : शंभूपुत्र आणि संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याची पताका फडकविणारे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचेही भव्य स्मारक पुणे येथे शनिवारवाडा आणि साताऱ्यात संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.
डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, पैठण धर्मपीठाच्या विरोधामुळे छत्रपती शिवरायांना वेदोक्त आणि पुराणोक्त असा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला. जाती व्यवस्थेला व वतनदारीला रयतेच्या हितासाठी विरोध हे शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी अंमलात आणले. महाराणी येसूबाई यांना संभाजीराजांनी श्री सखी राज्ञी जयती अशी स्वतंत्र अधिकाराची मोहोर दिली. त्यांची ही कृती स्त्री मुक्तीचा आवाज बुलंद करणारी होती.
धर्मरक्षणासाठी औरंगजेबाच्या विरोधात बलिदान देणाऱ्या छत्रपती शंभूराजे यांचे विचार, कार्यशैली यांना व्यक्त करणारे त्यांचे वढू तुळापूर येथील स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे असेच करावे. या स्मारकाचा नियोजित आराखडा केल्याबद्दल डॉ. पाटणकर यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.
छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज यांची कामगिरी गौरवास्पद आहे. सतत ४२ वर्षे मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकावणाऱ्या शाहू महाराजांचे स्मारक शनिवारवाडा पुणे व सातारा येथे व्हावे, याशिवाय शाहू महाराजांच्या राजकीय कारभाराचे आणि कार्यशैलीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी केली.
छत्रपती शाहू आणि स्वराज्य रक्षक सम्राज्ञी ताराराणी यांच्या माहुली येथील समाधी विपन्नावस्थेत असल्याबद्दल पाटणकर यांनी खंत व्यक्त केली. या ऐतिहासिक स्मारक आणि संशोधन केंद्राचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही देणार आहोत असे पाटणकर यांनी स्पष्ट करत मागणी दुर्लक्षित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला .