छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसलेंचे वृध्दापकाळाने निधन
By दीपक शिंदे | Published: September 13, 2022 06:33 PM2022-09-13T18:33:39+5:302022-09-13T22:36:17+5:30
शिवाजीराजे भोसले यांनी १९८५ ते १९९१ या कालावधीत सातारा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम केले होते.
सातारा : साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष, राजघराण्यातील बाराव्या पिढीचे सदस्य थोर समाजकारणी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पुणे येथे निधन झाले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अदालतवाडा येथे आणण्यात येणार आहे.
शिवाजीराजे भोसले यांनी १९८५ ते १९९१ या कालावधीत सातारा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून काम केले होते. मनमिळावू स्वभाव आणि विकासकामाचा आग्रह यामुळे त्यांनी आपल्या कामाची सातारा शहरात चांगली छाप सोडली. शिवाजीराजे भोसले यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ रोजी झाला. सातारा शहरातील अनेक सामाजिक व क्रीडा संघटनांशी ते संबंधित होते. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते उपाध्यक्ष होते. आरे गावच्या भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून सक्रिय होते. सेवाधाम अग्नि मंदिर, करंजे येथील प्रतिष्ठानचे देखील ते कार्याध्यक्ष होते.
शिवाजीराजे यांचे अदालत वाडा हे निवासस्थान कायमच राजकीय केंद्रबिंदू राहिले आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन घडवण्यात शिवाजीराजे यांचा मोठा वाटा होता. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवाजीराजे भोसले यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजघराण्यातील बाराव्या पिढीचा महत्त्वाचा दुवा अनंतात विलीन झाला. शिवाजीराजे यांच्या पार्थिवावर बुधवारी सातारा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात कन्या वृषालीराजे भोसले, पुतणे खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले असा परिवार आहे.