छत्रपती शिवरायांकडून विश्वाला वंदनीय राज्य निर्माण : कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:45+5:302021-06-01T04:28:45+5:30
नागठाणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरिबांना जवळ केले आणि त्यांच्या हातून स्वराज्याचे तोरण बांधले. माणसाला माणसासारखे वागून माणसासारखं जगायला ...
नागठाणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरगरिबांना जवळ केले आणि त्यांच्या हातून स्वराज्याचे तोरण बांधले. माणसाला माणसासारखे वागून माणसासारखं जगायला शिकवलं. जनतेच्या सहभागाशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही हे त्यांनी जाणले होते. अधिकार आणि कर्तव्याचा समन्वय साधला व विश्वाला वंदनीय राज्य निर्माण केले,’ असे उदगार प्रा. राजाराम कांबळे यांनी काढले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘मॅनेजमेंट गुरू छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील होते.
प्रा. कांबळे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला व्यवस्थापनाचे अनेक पैलू होते. त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये अर्थ व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन, गडांचे बांधकाम, प्रशासन कौशल्य, आरमार उभारणी, पर्यावरण व्यवस्थापन, शस्त्रास्त्रनिर्मिती, गनिमी कावा इत्यादी नीतीचा वापर करून रयतेचे राज्य निर्माण केले आणि प्रजेला पित्याप्रमाणे सांभाळले. त्यांच्या व्यवस्थापन तंत्रातून आजदेखील आपणास भरपूर शिकता येईल. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यवस्थापन गुरू आहेत.’
प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण सर्वसमावेशक असून कलागुण, कौशल्ये, बुद्धिचातुर्य, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी इत्यादी गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर कल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन करून जगापुढे आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले.
प्राध्यापक प्रबोधिनी विभागाचे प्रमुख प्रा. रघुनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. के. आतार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बालाजी शिनगारे यांनी आभार मानले. कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कार्यक्रमास संस्थेचे माजी सहसचिव (प्रशासन) मा. प्राचार्य डाॅ. अशोक करांडे, तळमावले महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गाडे व त्यांचे सहकारी प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ॲानलाइन सहभाग नोंदविला. तांत्रिक साहाय्य प्रा. स्नेहल वरेकर यांनी केले.