छत्रपतींच्या वंशजांनी जनतेच्या उठावाचे नेतृत्व करावे : भारत पाटणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:47 PM2017-10-11T16:47:44+5:302017-10-11T16:52:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.
सातारा ,11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी परंपरेला शोभेल असा संघर्ष करावा. चारशे वर्षांपूर्वी सरंजामशाहीमुळे संकटात सापडलेल्या जनतेला पेचातून सोडविण्यासाठी शिवरायांनी जे धोरण राबविले, तेच धोरण छत्रपतींच्या वंशजांनी राबवावे, जनतेच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.
येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. पाटणकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील जनतेला छत्रपती शिवराज, छत्रपती शंभूराजे आणि शंभूपुत्र शाहूमहाराज यांची देदीप्यमान परंपरा लाभली आहे. सरंजामदार, जमीनदारांपासून रयतेला मुक्त करण्याचे कार्य करण्याचा वारसादेखील आहे. शिवरायांनी जातीय शोषणाच्या उतरंडीला आव्हान देऊन अगदी तळातील जातींनाही सन्मानाने जगण्यासाठी परिसर तयार केला.
स्त्रियांना मुक्तपणे आणि निर्भयपणे जगता येणारी सामाजिक परिस्थिती तयार केली. हा वारसा जपण्याची जबाबदारी छत्रपतींचे वंशज आणि सातारकर जनतेचीदेखील आहे. या जबाबदारीला तडा पडेल, अशा घटना इथून पुढे घडू नयेत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. आज देशातील कष्टकरी जनता संकटात आहे.
बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शासनाच्या घोषणांमधून दुष्काळ नाहीसा होईल, असे वाटत नसल्याने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. सार्वत्रिकपणे भयाच्या छायेखाली जनतेला ठेवले जात आहे. जातीभेदाचे राजकारण खेळून समाजात भिंती निर्माण केल्या जात आहेत. अशी परिस्थिती बदलून भयमुक्त पर्यावरण संतुलित आणि सर्व कष्टकरी जनतेच्या जीवनात समृद्धी आणणारा विकासाचा आराखडा राबविण्यासाठी, जातीअंतासाठी, स्त्रीमुक्तीसाठी जनचळवळ उभारणे तातडीचे बनले आहे. वास्तविक, अशी चळवळ उभी करणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आहे.
छत्रपतींच्या सर्व वारसांनी यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी डॉ. पाटणकर यांनी केले. पत्रकार परिषदेला डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, संतोष घोटल, यशवंत लावंड, जयसिंग कदम आदींची उपस्थिती होती.
या प्रश्नांवर लढा उभारा
- शेतकरी, कामगारांना उद्ध्वस्त करणारी सरकारची धोरणे
- भांडवलदारांसाठी शेतकºयांना भूमिहीन करून घातक प्रकल्पांची उभारणी
- कोट्यवधी रुपये खर्चूनही दुष्काळ कायम
- अन्यायाविरुध्द लढणाºयाला संपविण्याचे कारस्थान
- शेतकºयांची कर्जबाजारी
- अन्यायकारक टोलनाके बंद झालेच पाहिजेत
शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत धोरण हाती घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न हाती घ्यावा. हे धोरण राबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात होणाºया उठावाचे नेतृत्व छत्रपतींच्या वंशजांनी करावे.
- डॉ. भारत पाटणकर