ई निविदा प्रक्रियेवर मुख्याधिकारी ठाम
By admin | Published: September 3, 2014 08:48 PM2014-09-03T20:48:46+5:302014-09-04T00:07:12+5:30
सातारा पालिका : खाबुगिरीला आळा घालण्यासाठी कडक अंमलबजावणी
सातारा : पालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणारी विकासकामे ई निविदेद्वारेच करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रियेमुळे खाबुगिरीला आळा बसणार असल्याने या प्रक्रियेला विरोध झाला असला तरीही तो डावलून ई निविदांची प्रक्रिया सुरुच ठेवली आहे.
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, दोन्ही आघाड्यांत पाय ओढा-ओढीचे राजकारण वाढले आहे. एका आघाडीने मांडलेला मुद्दा किंवा विषय हाणून पाडण्यावर दुसऱ्या आघाडीतील काही नगरसेवकांचा भर असतो. त्यातच दोन्ही आघाड्यांमध्ये मलिद्यावर ताव मारणारे काही झारीतील शुक्राचार्यही कमी नाहीत. दोन्ही आघाड्यांना चुचकारुन आपल्या पदरात वजनी माप पाडून घेणारे पालिकेच्या बाहेरील ‘नारद’ही आहेत. या सर्वांच्या ‘हो ना’ वृत्तीशी सामना करत पालिका प्रशासनाला योजना राबवाव्या लागत आहेत. प्रशासन हे आपल्या हातातील ‘बाहुले’ आहे, असाही काहींचा गैरसमज आहे. त्यांना समज देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
ई टेंडरिंग प्रक्रियेमुळे पालिकेत असणारी अनेकांची दुकाने बंद होणार आहेत. कामे देताना अधिक पारदर्शकता येईल. तसेच या कामांच्या गुणवत्तेवरही प्रशासनाचा अंकुश राहिल.
नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही, अशा अनेक हितकारक गोष्टी घडणार आहेत. मात्र, आपली दुकाने बंद होण्याच्या भीतीने अनेक जण धास्तावल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला’ असं म्हणून रात्री अपरात्री साखर झोपेतल्या लोकांना जागं करण्याचं काम काही ‘कोतवाल’ मिजाशीनं करत आहेत.
सातारचं तिकडं काहीही होवो आपल्याला टक्का मिळाला म्हणजे झालं, एवढ्यावरच काहींची नजर आहे. रचनात्मक विकासाला त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. पालिका प्रशासनाने अशा ‘कोतवालांची’ चाल ओळखून चांगले काम मागे घेता कामा नये, अशी नागरिकांची इच्छा आहे. पारदर्शक कारभार होणे, सर्वांसाठीच लाभदायक आहे.
या पार्श्वभूमीवर आघाड्यांतील राजकारणाची तमा न बाळगता पालिका प्रशासनाने ई निविदा प्रक्रिया सुरुच ठेवली आहे. ५ लाखांच्या पुढील सर्वच कामे ई टेंडरिंग प्रक्रियेनेच करायची, असे धोरण आखले आहे. ई टेंडरिंग प्रक्रियेमध्ये काही बोगसगिरी झाली असेल तर त्याविरोधात तक्रार करण्याचे अधिकार सामान्य नागरिकालाही आहे. त्यामुळे लांडगा आला रे आला म्हणत चांगल्या गोष्टीला विरोध करण्याची वृत्ती हाणून पाडण्याचेच प्रयत्न व्हायला हवेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
कूपर कारखाना ते कमानी हौद, मोती चौक ते बुधवार नाका, बुधवार नाका ते कोमटी चौक, जिल्हा कारागृह ते मनाली हॉटेल, मोती तळे ते सुरुची बंगला मार्गे गेंडामाळ नाका, नागाचा पार ते भटजी महाराज मठ व मंगळवार पेठेतील नंदादीप अपार्टमेंट ते खारी विहीर या सात रस्त्यांसाठी ही निविदा प्रक्रिया राबविली आहे.
ई टेंडरिंग प्रक्रिया ही चांगल्या कारभाराची नांदी आहे. शासनाच्या आदेशानुसारच आम्ही ही प्रक्रिया राबविली आहे. यामुळे स्पर्धा वाढेल आणि अधिक दर्जेदार कामे होतील. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यावर आम्ही ठाम आहोत.
- अभिजित बापट,
मुख्याधिकारी