मुख्य सूत्रधार महिलेच्या घरावर छापा
By admin | Published: February 10, 2015 10:26 PM2015-02-10T22:26:29+5:302015-02-10T23:57:08+5:30
घरकुल फसवणूक प्रकरण : कोरे अर्ज जप्त, दोघांचा शोध सुरू
कऱ्हाड : घरकुल फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शुभांगी शेळके हीच्या वाटेगाव, ता. वाळवा येथील घरावर कऱ्हाड शहर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. घरकुल योजनेच्या नावे असलेले कोरे अर्ज पोलिसांनी जप्त केले. मंगळवारी शुभांगी शेळके हीची पुन्हा एकदा पोलिसांनी कसुन चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली असुन एक संशयीत पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी १ लाख १० हजार रूपयांचे कर्ज मिळवून देते, असे सांगून शुभांगी शेळके हीने कऱ्हाडसह परिसरातील शेकडो महिलांना गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला. याबाबत तीच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. रविवारी शुभांगी शेळके स्वत:हून पोलिसात हजर झाली. पोलिसांनी तीचा जबाब नोंदवला. त्यावेळी तीने याप्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे सांगीतले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी कऱ्हाड शहर पोलिसांनी शेळकेच्या वाटेगाव येथील घरावर छापा टाकला. तेथील कागदपत्रांची तपासणी केल्यावर ज्या अर्जाचा वापर करून महिलांची फसवणूक करण्यात आली तसेच कोरे अर्ज पोलिसांना सापडले. ते सर्व अर्ज पोलिसांनी जप्त केले. (प्रतिनिधी)