‘सीओं’बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!
By admin | Published: June 19, 2017 12:50 AM2017-06-19T00:50:17+5:302017-06-19T00:50:17+5:30
लवकरच बदली : उपोषण मागे; कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षांची माहिती
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी रविवारी मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना दिली. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेत संप मिटल्याचे जाहीर केले.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तहसीलदार राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याविरोधात गत सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण तसेच काम बंद आंदोलन सुरू केले होते. तसेच नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकही मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करीत होते. संपाचा आजचा सातवा दिवस असताना दुपारी अचानक नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांची कमराबंद चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण उपोषणस्थळी दाखल झाले.
उपोषणकर्त्यांशी बोलताना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, ‘मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मीसुद्धा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलले. मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडून पालिका कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास, अनेक मार्गाने केलेला भ्रष्टाचार याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या चर्चेदरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण व आंदोलन मागे घ्यावे.
नगराध्यक्षांनी विनंती केल्यानंतर कर्मचाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तहसीलदार राजेंद्र शेळके, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विक्रम पावसकर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
कर्मचाऱ्यांनीही व्यक्त केल्या भावना !
गेली सात दिवस सुरू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर गोड झाल्याने अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यांनी उपोषण सोडताना उशिरा का होईना शासनाने मागण्यांची दखल घेतली, असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.