पन्नासच्यावर जेसीबींद्वारे पुष्पवृष्टी, क्रेनने घातला पुष्पहार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात जंगी स्वागत
By प्रमोद सुकरे | Published: May 13, 2023 03:19 PM2023-05-13T15:19:00+5:302023-05-13T15:24:38+5:30
मंत्री चंद्रकांत पाटील ताटकळले
कराड: सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे शनिवारी प्रथमच सातारा दौऱ्यावर आले. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळे दुरूस्तीनंतर ते पुन्हा पाटणकडे रवाना झाले. पण सकाळी १० ३० चा कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरू झाला.मात्र कार्यक्रम ४ तास उशिरा सुरु होऊनही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.
सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार,पालकमंत्री शंभूराज देसाई ,नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक आमदार व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाची पाटणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. हेलिकॉप्टर कार्यस्थळावर उतरताच त्यांचे शासकीय अधिकारी यांनी स्वागत केले. त्यांतर पालकमंत्री शंभूराज देसाई व इतरांनी स्वागत केले. त्यानंतर ५० वर जेसीबीच्या बकेट मधुन पुष्पव्रष्टी करीत त्यांचे स्वागत केले.क्रेनच्या माध्यमातून भला मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मंत्री चंद्रकांत पाटील ताटकळले
या कार्यक्रमाचे निमित्ताने भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रम ठिकाणी सकाळी ११ वाजताच पोहोचले होते. मात्र मुख्यमंत्री न आल्याने ते बराच वेळ ताटकळत बसले होते.