मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:59 AM2024-05-31T11:59:52+5:302024-05-31T12:00:40+5:30

''मनुस्मृती अभ्यासक्रमात आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव''

Chief Minister should pay attention to the drought in the state instead of staying in the village farm says Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

कऱ्हाड (जि.सातारा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळगावी आले आहेत. मी शेतकरी असून सध्या शेतात असल्याचे ते ट्विट करत आहेत; पण आपण मुख्यमंत्री आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे. राज्यात सध्या तीव्र दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे,’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

कऱ्हाड दौऱ्यावर आलेले पटोले म्हणाले, ‘ आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यानाची धास्ती नाही. पंतप्रधान म्हणून त्यांचे हे शेवटचे ध्यान आहे. फक्त सध्या आचारसंहिता असल्याने त्यांचे ध्यान माध्यमातून येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. ते आचारसंहितेत बसत नाही अन् नरेंद्र मोदी म्हणून त्यांना पुढील काळात आता ध्यानच करत बसायचे आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो फाडले गेले याचे समर्थन कोणीही करणार नाही; पण मनुस्मृती अभ्यासात यावी, हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस नेहमीच विरोध करेल. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव आहे. तो कालबाह्य ग्रंथ आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश होऊ देणार नाही.

पोर्शे अपघातप्रकरणी त्या गाडीत कोण-कोण होते? हे पुढे का येत नाही. पोलिस प्रकरण का दाबत आहेत? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. कारण आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचा विश्वास राहिलेला नाही. राज्याच्या जनतेने कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणाचा दबाव आहे, हे सगळे समोर आले पाहिजे. श्रीमंतांना वेगळा कायदा आहे का? असा सवाल करत जनता भयभीत आहे म्हणून मुख्यमंत्री यांनी उत्तर द्यावे, असेही पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

याचे उत्तर आव्हाडच देतील..

महाविकास आघाडीने संविधान वाचवा म्हणून प्रचार केला; पण त्याचा घटकपक्ष असलेल्या एका पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या विरोधात कृती केली आहे. याबाबत छेडताच याचे उत्तर जितेंद्र आव्हाड देतील, असे पटोले म्हणाले.

आम्ही बोललो की, त्यांना स्टंट वाटतो..

आज गरिबांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार राहिलेला नाही. श्रीमंत लोक त्यांची मुले पबमध्ये राहतील. तेथून गाडीची रेस लावतील गरिबांना चिरडून टाकतील. आम्ही त्यावर बोललो, जनतेचे प्रश्न मांडले की माजलेल्या सत्ताधाऱ्यांना स्टंट वाटत आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले.

Web Title: Chief Minister should pay attention to the drought in the state instead of staying in the village farm says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.