मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेही राबताहेत शेतात!, भात लावणीत मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:10 PM2023-07-18T18:10:40+5:302023-07-18T18:13:18+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाने कधीही तुटू दिली नाही गावाची आणि शेतीची नाळ
पेट्री : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोजच्या धावपळीतून आपल्या जन्मगावी महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब येथे प्रत्येक वर्षी भात लावणीसाठी येत असतात. इथे आल्यावर आपल्या शेतात स्वतः शेतकरी बनून कामे करतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे गेली दोन दिवस भात लावणीत मग्न झाले आहेत.
कोयना काठचे शेतकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावी दरे तर्फे तांब (ता. महाबळेश्वर) येथे आल्यावर शेतीतील सर्व कामे करतात. मात्र, यावेळी पावसाळा उशिरा सुरू झाला. भात लावणीही लांबली. राज्याचे पावसाळी अधिवेशनही सुरू झाले. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर्षी भात लावणीची जबाबदारी घेतली आहे. तेही आता शेतीत भात लावणी करताना दिसत होते. आपल्या शेतात त्यांनी छोट्या ट्रक्टरच्या साह्याने चिखल केला. तर त्यापाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यासही मदत केली. चिखल करण्यासही ते मदत करताना दिसत होते.
बऱ्याचदा उच्चपदस्थ मंडळी शेतीच्या नादाला लागत नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाने आपल्या गावाची आणि शेतीची नाळ कधीही तुटू दिली नाही. मी कोण मोठा आहे हे न दाखवता ते नेहमी गावी आल्यावर शेतात झाडे लावणे, स्ट्रॉबेरी लागवड, भात शेती यांची कामे ते आस्थेवाईकपणे करतात. त्यामुळे आता मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे शेतात जात होते. दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गावी आले असता, ते दोन दिवस भात लावणी करण्यात मग्न झाले होते.
शिवारात घुमताहेत भलरीचे स्वर !
भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी तालावर भलरी गीते म्हटली जातात. या ठिकाणीही भलरी गीतांच्या तालावर भात लावणी करण्यात आली. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना कंटाळा येऊ नये यासाठी ही गीते म्हटली जातात. त्यामुळे कामही लवकर होते.
पानापानातून वाढणारे झाड, भात शेतीत वाढणारी भात रोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा, हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची व आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती. -डॉ. श्रीकांत शिंदे खासदार, ठाणे