जलवाहिनीच्या चारीतील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:45+5:302021-06-18T04:27:45+5:30
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या चारीत पावसाच्या साठलेल्या पाण्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेला मुलगा ...
मसूर : कऱ्हाड तालुक्यातील चिखली गावच्या हद्दीत हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या चारीत पावसाच्या साठलेल्या पाण्यात शेळ्या चारण्यासाठी गेलेला मुलगा बुडून मृत झाला. सिद्धेश हणमंत सरगर (वय १२) असे मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, सध्या मसूर पूर्व भागात हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या जलवाहिनी खुदाईचे काम सुरू आहे. चिखली येथे सरगराची टेकडी नावाच्या शिवारात हणबरवाडी-धनगरवाडी योजनेच्या जलवाहिनीसाठी मोठी चर खोदण्यात आली आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या चारीत पाणी साचले आहे. सिद्धेश सरगर हा शेळ्या चारण्यासाठी या ठिकाणी गेला होता. अचानकपणे पाय घसरल्याने सिद्धेश हा चारीमध्ये पडला. पोहता येत नसल्याने सिद्धेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची खबर हणमंत गणपत सरगर यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज पवार हे तपास करीत आहेत.