आईचा बुरखा चाकात अडकल्याने मुलाचा मृत्यू; तळबीड परिसरातील घटना
By दत्ता यादव | Published: December 30, 2023 08:40 PM2023-12-30T20:40:57+5:302023-12-30T20:41:06+5:30
दहा दिवसांनंतर मृत्यूशी झुंज अपयशी
सातारा : मुलाला मदरशामध्ये प्रवेश घेण्यासाठी जात असताना दुचाकीवर मागे बसलेल्या आईचा बुरखा अचानक चाकात अकडला. त्यामुळे दुचाकीवरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कऱ्हाड तालुक्यातील तळबीड परिसरात घडली. हा अपघात दि. १९ डिसेंबर रोजी झाला.
जाफर सैफन शेख (वय २३, रा. मुजावर काॅलनी, शनिवार पेठ, सातारा) असे दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफर हा त्याच्या लहान मुलाला उंब्रज परिसरातील मदरशामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याच्या आईसोबत दुचाकीवरून जात होता. तळबीड परिसरात आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या त्याच्या आईचा बुरखा मागील चाकात अडकला. त्यामुळे दुचाकी चालवत असलेला जाफर उडून पुढे पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर त्याचा मुलगा आणि आई सुद्धा यात किरकोळ जखमी झाली. जाफरला तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर दि. २९ रोजी दुपारी एक वाजता अपयशी ठरली. तळबीड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक फाैजदार शशिकांत खराडे हे अधिक तपास करीत आहेत.
सतर्कता महत्त्वाची...
दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या महिलांनी साडी, बुरखा व्यवस्थित आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. अचानक अशाप्रकारचे अपघात कधीही होऊशकतात. हे टाळण्यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी सांगितले.