Leopard attack : आम्हांला पैसे नको.. आमचं लेकरू द्या!, येणकेत नातेवाईकांचं रुदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 04:31 PM2021-11-16T16:31:20+5:302021-11-16T16:32:18+5:30
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला.
संजय पाटील
कऱ्हाड : बिबट्याने शेळी फाडली तेव्हाच वन विभागाकडे मदत मागितलेली; पण बिबट्या नरभक्षक नाही, असे म्हणून वनाधिकाऱ्यांनी हात वर केले. तो काही करणार नाही, अशी समजूतही त्यांनी काढली. मात्र, ज्याची भीती होती तेच घडलं. बिबट्याने चिमुकल्याचा बळी घेतला. आता भरपाई नको. आम्हांला आमचं लेकरू द्या...
येणके, ता. कऱ्हाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या आकाश भील या चिमुकल्याच्या नातेवाईकांचं हे रुदन. त्यांच्या काळजातील आग शब्दावाटे बाहेर पडली आणि ग्रामस्थांच्या अंगाचाही थरकाप उडाला. ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना फैलावर घेतले. एवढेच नव्हे तर ऊसाच्या फडातूनही त्यांना बाहेर पडू दिले नाही. सुमारे चार तासांनंतर पोलीस फौजफाट्यात चिमुकल्याचा मृतदेह आणि वनाधिकाऱ्यांना ऊसाच्या फडातून पायवाटेने बाहेर काढण्यात आले.
काही दिवसांपासून येणकेच्या शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते. त्याने काही पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठारही केले. त्यावेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. मात्र, वन विभागाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप सध्या ग्रामस्थांतून केला जात आहे.
आता म्हणे... बिबट्याला पकडणार!
आक्रमक झालेल्या जमावाने वनाधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडणार असल्याचे सांगून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी कात्रज आणि सातारच्या पथकाकडून ‘ऑपरेशन’ राबविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतरही जमाव शांत झाला नाही.
ऊसाच्या सडात अडकली पॅन्ट
बिबट्याने जबड्यात आकाशचा गळा पकडला होता. त्याने त्याला एवढ्या जोरात फरपटत नेले होते की, आकाशच्या पॅन्टचे हूक, बटण तुटून ती ऊसाच्या सडात अडकली होती. सुमारे पाच शेत त्याने आकाशला फरपटत नेले. त्यानंतर आरडाओरडा आणि गोंधळ केल्यानंतर बिबट्याने आकाशला ऊसातच सोडून तेथुन धूम ठोकली.
तीनशे ते चारशेचा जमाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणे, येणके, पोतले, किरपे या गावातील ग्रामस्थांसह परिसरातील ग्रामस्थांनीही त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी तीनशे ते चारशेजणांचा जमाव झाला होता. तसेच ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळे तातडीने पोलीस फौजफाटाही मागविण्यात आला.
येणके गावातील ‘ती’ घटना!
- येणके परिसरात गत अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. काही वर्षांपूर्वी एका बिबट्याचा ग्रामस्थांच्या हल्ल्यात बळी गेला होता.
- एका घरात बिबट्या दबा धरून बसला होता. त्याने हल्लाही केल्यामुळे घाबरलेल्या ग्रामस्थांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.
- घरातून बाहेर पडलेला बिबट्या ग्रामस्थांच्या अंगावर गेल्यानंतर त्याला जमावाने ठार मारले होते.
-काही वर्षांपूर्वीची ही घटना आजही तालुक्यात चर्चिली जाते.