जमिनीच्या वादातून बालकाचा खून ; मृतदेह विहिरीत फेकून दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:41 PM2019-02-04T22:41:41+5:302019-02-04T22:41:58+5:30
फलटण : जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने मामा असलेल्या एकाने गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून ...
फलटण : जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने मामा असलेल्या एकाने गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील सपकळवाडी येथे घडली. याप्र्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. कल्पेश भाऊसाहेब सपकळ असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, कल्पेश सपकळ हा बुधवार, दि. ३० पासून बेपत्ता होता. यामुळे कल्पेशची आई रंजना यांनी गुरुवार, दि. ३१ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचा शोध घेत होते.
तपास करीत असताना गावातील काही लोकांनी कल्पेश यास नात्यातील पांडुरंग सदाशिव घाडगे (वय ३७, रा. सपकळवाडी, मूळगाव चिंचणी, ता. खटाव) याच्यासोबत पाहिले. तसेच त्याचा पूर्व इतिहास गुन्हेगारी स्वरुपाचा असल्याचे सांगितले.
त्या माहितीवरून पोलिसांनी संशयित पांडुरंग घाडगे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत ‘जमिनीच्या हव्यासापोटी बुधवार, दि. ३० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कल्पेशला वडापाव खायला देतो, असे आमिष दाखवून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्याचा सपकळवाडी येथील ओढ्याकडेला असलेल्या शेताजवळ नेऊन नाक, तोंड, गळा दाबून खून केला. पुरावा नाहीसा करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला,’ अशी माहिती दिली. पोलिसांनी घाडगेसोबत विहिरीत पाहिले असता कल्पेशचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग घाडगे यास अटक केली.
वडापाव देऊन अपहरण
भाऊसाहेब आणि रंजना सपकळ यांना कल्पेश हा एकुलता एक मुलगा होता. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी कल्पेशचा जन्म झाला. भाऊसाहेब यांच्या नावावर पाच एकर शेती होती. कल्पेशचे वडील भोळसट स्वभावाचे असल्याने ‘भाऊसाहेब यांच्या बहिणीचा नवरा असलेल्या पांडुरंग घाडगे याची बºयाच वर्षांपासून जमिनीवर नजर होती. वारसाहक्काने भविष्यात ही जमीन कल्पेशला मिळणार असल्याने जमिनीच्या हव्यासापोटी पांडुरंगने कल्पेशचा खून केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक ए. आर. मांजरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.