चौथ्या मजल्यावरून पडून बालक जखमी
By admin | Published: January 5, 2016 12:48 AM2016-01-05T00:48:20+5:302016-01-05T00:48:20+5:30
पोवई नाक्याजवळील दुर्घटना
सातारा : येथील पोवई नाक्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून गवंड्याचा चार वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी खाली पडला. या दुर्घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
बर्मराज राजकुमार काकडे असे या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील राजकुमार काकडे हे गवंडी काम करतात. ते मूळचे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रहिवासी आहेत. पोवई नाक्यावर ‘बीएसएनएल’ कार्यालयाच्या मागील बाजूस ‘राजसी बिझनेस सेंटर’ या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काकडे सोमवारी दुपारी काम करीत होते.
इमारतीजवळच गवंड्यांच्या कुटुंबांना राहण्यासाठी तात्पुरता निवारा केला आहे. या निवाऱ्याच्या परिसरात दुपारी बर्मराज खेळत होता. खेळता-खेळता तो वडिलांकडे चौथ्या मजल्यावर गेला. मात्र, तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत बर्मराजला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. (प्रतिनिधी)