मुलाच्या मृत्युचं दु:ख बाजुला सारून केले अवयवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:28 PM2017-09-29T14:28:41+5:302017-09-29T14:28:52+5:30
मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्युचं डोंगराएवढं दु:ख बाजुला सारून या कुटूंबाने त्याचे अवयव दान केले.
आॅनलाईन लोकमत
शामगाव (जि. सातारा) : मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्युचं डोंगराएवढं दु:ख बाजुला सारून या कुटूंबाने त्याचे अवयव दान केले. मुलाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या अवयवाच्या रूपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत या कुटूंबाने हा आदर्शवत निर्णय घेतला.
कºहाड तालुक्यातील निगडी गावातील चंद्रकांत घोलप हे अल्पशिक्षित. शेती करायची म्हटलं तरी क्षेत्रही अल्प. त्यामुळे कंपनीत नोकरी करून चंद्रकांत हे आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. काही वर्षांपुर्वी ते पत्नी कुसुम व तीन आपत्यांसह उदरनिवार्हासाठी मध्यप्रदेशला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. या नोकरीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कुटूंबाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वर्षांनी संबंधित कंपनी बंद पडली. पुन्हा या कुटूंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. मध्यप्रदेशमध्येच काहीकाळ मिळेल ते काम करून चंद्रकांत यांच्यासह कुटूंबियांनी गुजराण केली. अखेर पुन्हा हे कुटूंब मध्यप्रदेशातून नाशिकला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत व कुसूम यांनी मोलमजुरी करून आपली दोन मुले व मुलीला शिकवले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुलगी गायत्रीचे लग्नही झाले. तर मोठा मुलगा निलेश शिक्षण घेऊन नवी मुंबईतील कोपरखैरने परिसरात नोकरीनिमित्त वास्तव्यास गेला. त्याठिकाणी तो पत्नीसमवेत राहतो. चंद्रकांत व कुसूम यांचा धाकटा मुलगा लोकेश यानेही उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तोही नवी मुंबईला भाऊ निलेशकडे राहण्यास गेला. त्याठिकाणी एका खासगी कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर काम करीत होता.
गत गुरूवारी नेहमीप्रमाणे लोकेश आॅफीसला जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्रही त्याला घेण्यासाठी घरापर्यंत आला. दोघेजण दुचाकीवरून कंपनीत जाण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. तेथील वाहतूक पोलिसांनी लोकेशला उपचारासाठी अपोलो रूग्णालयात दाखल केले. मात्र, तीन दिवसांनी तेथील डॉक्टरांनी लोकेशचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटूंबिय शोकसागरात बुडाले.
दरम्यान, लोकेशचे अवयव दान करण्याचा सल्ला रूग्णालयातील डॉक्टरांनी कुटूंबियांना दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असतानाही यावर विचार करून लोकेशच्या आई, वडील बहीण व भाऊ यांनी लोकेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकेशचे डोळे, दोन किडन्या, हृदय, लिव्हर या अवयवांची दानप्रक्रीया डॉक्टरांनी पूर्ण केली. तसेच लोकेशचे शव कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेहावर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माझ्या मुलाच्या अवयवांमुळे चार जणांना जिवदान मिळाले. अवयव दानाचा निर्णय माझ्यासह कुटूंबियांसाठी खुप अवघड होता; पण लोकेशच्या अवयवांमुळे आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, या जाणिवेतून आम्ही हा निर्णय घेतला. - चंद्रकांत घोलप, लोकेशचे वडील