मोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर : रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:09 PM2018-06-04T14:09:24+5:302018-06-04T14:09:24+5:30
सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.
दिलीप पाडळे
पाचगणी : सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.
उन्हाळी सुटी म्हटली की बालचमू हरकून जायचा, ती एक वेगळीच मज्जा होती. केव्हा एकदा परीक्षा होतीय आणि कधी एकदा धमाल करायला मिळतेय, असं वाटायचं. गावगावीच्या जत्रा करायच्या, आठ-दहा वर्षांपूर्वी तर लग्नाला जायचं ते वऱ्हाडी बनून बैलगाडीतून, भर दुपारी नदी विहिरीवर तासन्तास पोहण्याचा आनंद घ्यायचा. पाचगणी परिसरात तर डोंगरकपारीतून दिवसभर फिरायचं.
जांभूळ, आंबे, करवंद, टेमबुर्ण यासारखी फळ घरी न आणता रानातच शेतात खड्डा खणून मातीत पुरायची, त्यावर पुन्हा मातीचा ढिगारा लावून आडी करायची. रानातच फळ पिकवून खायची, रानावनात भटकंती करायची, झाडांवर कोठे मधाचा पोळ दिसतंय का पाहायचं, झाडांच्या सानिध्यातच सुरपाट्या खेळत बसायचं. मामाच्या गावाला पण जायचं, हेच बालपण मोबाईलच्या जमान्यात दिसेनासं झालंय.
आताची लहान मुलांची बालपणांची गोडीच मोबाईलने हिरावून घेतलीय. मनसोक्त, मनमुराद, बालपणातील खोडकर धमाल, मस्ती मोबाईलच्या आॅनलाईन जमान्यानं दूर केली आहे. सदैव ही पिढी मोबाईलमध्ये हरवून गेल्याची पाहावयास मिळत आहे.
खोड्या, दंगा मस्ती गेली कुठे?
नेटन हरवलंय बालपण, देईल कोण शहाणपण, असं म्हणण्याची वेळ या पिढीवर येऊ शकते. आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती दिसत आहे.
उन्हाळी सुटीची मज्जा, बालपणीच्या खोडकर दंगा, मस्ती न घालविता बालपणच हरवून स्वत:ला मोबाईलच्या नेटमध्ये गुंतवून घेतेय आणि विसरून जातेय की पुन्हा पुन्हा नाही येत ही बालपणीचं जीवन, त्यात खूप रंग भरायचे असतात, तेच रंग उभ्या आयुष्यात आठवणींची शिदोरी म्हणून जपून ठेवायची असतात. तीच आठवण उद्या भावी आयुष्यात, अचानक उतारवयात नजरेसमोर एक यादगार आठवण देणार आहे.