कोरोना योद्धयांच्या मुलांनाही आई-बाबांसारखं पोलीस, डॉक्टर व्हायचंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:23+5:302021-05-18T04:40:23+5:30

कऱ्हाड : आई-बाबांच्या सहवासाला प्रत्येक लेकरू अधीर असतं; पण डॉक्टर आणि पोलिसांची शेकडो मुलं सध्या आई-बाबांच्या वाटेकडे डोळे लावून ...

The children of Corona Warriors also want to be policemen and doctors like their parents! | कोरोना योद्धयांच्या मुलांनाही आई-बाबांसारखं पोलीस, डॉक्टर व्हायचंय!

कोरोना योद्धयांच्या मुलांनाही आई-बाबांसारखं पोलीस, डॉक्टर व्हायचंय!

Next

कऱ्हाड : आई-बाबांच्या सहवासाला प्रत्येक लेकरू अधीर असतं; पण डॉक्टर आणि पोलिसांची शेकडो मुलं सध्या आई-बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसताहेत. कोरोना महामारीशी लढताना डॉक्टर आणि पोलिसांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना द्यायला वेळ नाही. मात्र, तरीही बहुतांश मुलांना कोरोना योद्धा असलेल्या आपल्या आई-बाबांसारखंच पोलीस, डॉक्टर व्हायचंय.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय. त्यामुळे प्रशासकीय नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले असून, त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. पोलीस चोवीस तास रस्त्यावर थांबत असून, त्यामध्ये महिला अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाशी सुरू असणाऱ्या लढ्यात आरोग्य विभागाची भूमिकाही महत्त्वाची आहे. अगदी स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत आणि पालिका आरोग्य विभागापासून मोठमोठ्या हॉस्पिटलच्या प्रशासनापर्यंत प्रत्येकजण या लढ्यात जिवाची पर्वा न करता सहभागी आहे. डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज रूग्णांचा सामना करावा लागतोय. कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे; पण तरीही ते माघार घेत नाहीत. समोर येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत ते कर्तव्य बजावत आहेत. मात्र, हे करत असताना त्यांना आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. मुले घरी वाट पाहतायत, हे माहिती असूनही पोलीस, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कर्तव्याला प्रथम प्राधान्य देतात. त्यांची मुलेही आई-बाबांच्या या कर्तव्याला एकप्रकारे पाठिंबाच देत असून, मोठेपणी आपल्यालाही आई-बाबांसारखं डॉक्टर, पोलीस व्हायचं असल्याचं ते सांगत आहेत.

- कोट (फोटो : १७सानवी साळुंखे)

माझे आई-बाबा दोघेही पोलीस आहेत. कोरोना आल्यापासून ते सतत ड्युटीवर असतात. मला त्यांचा जास्त सहवास मिळत नाही. आत्ताची परिस्थिती वाईट आहे. या परिस्थितीत माझे आई-बाबा त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. मला माझ्या आई-बाबांचा अभिमान आहे.

- सानवी सचिन साळुंखे, कऱ्हाड

- कोट (१७शालवी पवार)

माझे पप्पा सतत ड्युटीवर जातात. मी त्यांना खूप मिस करते. त्यांनी घरी थांबावं, असं मला वाटतं; पण ड्युटीवरही जायला हवं ना. बाहेर कोरोना आलाय. माणसांना सांगूनही ते ऐकत नाहीत, घरात थांबत नाहीत. मग माझ्या पप्पांना ड्युटीसाठी रस्त्यावर जावच लागतं.

- शालवी संतोष पवार, कऱ्हाड

- कोट (१७श्रेयस पवार)

मला माझ्या पप्पांसारखंच पोलीस बनायला आवडेल. पप्पांना मला वेळ देता येत नाही. मला वाईट वाटतं; पण आम्ही समजून घेतो. कोरोनामुळे त्यांना ड्युटीवर जाणं महत्त्वाचं असतं. त्यांच्यासारखंच काम करायला मलाही आवडेल. मी पोलीस अधिकारी होणार.

- श्रेयस अमोल पवार, कऱ्हाड

- कोट (१७ अनाया पाटील)

माझी मम्मा डॉक्टर आहे. बाबाही डॉक्टर आहेत. ते कोरोना रुग्णांवर उपचार करतात. त्यांचा मला अभिमान वाटतो. ड्युटीवरून आले की ते आम्हाला वेळ देतात. मलाही मम्मा-बाबांसारखं डॉक्टर व्हायचं आहे. रुग्ण तपासायचे आहेत. डॉक्टर म्हणून काम करायचं आहे.

- अनाया श्रीरामचंद्र पाटील, कऱ्हाड

- कोट (१७ रणवीर सूर्यवंशी)

माझे मॉम आणि डॅड डॉक्टर आहेत. ते सतत कामात असतात. कोरोना असूनही ते रुग्ण तपासतात, रुग्णांची सेवा करतात. मला त्यांच्या कामाचं कौतुक वाटतं. खूप अभ्यास करून मलाही मॉम आणि डॅडसारखंच डॉक्टर व्हायचं आहे.

- रणवीर श्रीकांत सूर्यवंशी, कऱ्हाड

- कोट (फोटो : १७अनन्या त्रिभुवन)

कोरोना व लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंद आहे. तरीही माझे डॅडी दररोज दवाखान्यात जातात. शाळा बंद असल्यामुळे आम्हाला भरपूर वेळ आहे. मात्र, डॅडींना दवाखान्यात काम करावे लागते. कोरोनामुळे त्यांना आमच्यासाठी वेळच देता येत नाही.

- अनन्या सुरज त्रिभुवन, आगाशिवनगर

- चौकट

घरी येताच घेतात स्वच्छतेची खबरदारी

डॉक्टर आणि पोलीस कोरोनाविरोधात लढत असताना त्यांचे कुटुंबीय मात्र सतत चिंतेत राहात असल्याचे दिसते. संबंधित कुटुंबातील मुले आई-वडील घरी येण्याची वाट पाहत असतात. तेसुद्धा मुलांना भेटण्यासाठी आतूर असतात. मात्र, घरी पोहोचले तरी त्यांना थेट मुलांजवळ जाता येत नाही. स्वच्छतेची खबरदारी घेण्याबरोबरच स्वत:पासून मुलांना आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठीही डॉक्टर आणि पोलिसांना दक्ष राहावे लागते.

Web Title: The children of Corona Warriors also want to be policemen and doctors like their parents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.