मुलांना लागले शाळेचे वेध... पण लसीकरण ठरवणार पुढचे बेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:44+5:302021-05-15T04:36:44+5:30

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक ...

The children have to go to school ... but the next step is to decide on vaccination! | मुलांना लागले शाळेचे वेध... पण लसीकरण ठरवणार पुढचे बेत!

मुलांना लागले शाळेचे वेध... पण लसीकरण ठरवणार पुढचे बेत!

Next

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. घरात बसून वैतागलेल्या मुलांना शाळेचे वेध लागले आहेत, पण लसीकरण झाल्याशिवाय पुढचे चित्रच अस्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर आणि सांगलीत २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीपासून मुलांच्या शाळेत जाण्यात खंड पडत गेला. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि पंधरा पंधरा दिवसांचे लॉकडाऊन पडू लागल्याने मुलांचे शाळेत जाणे बंद होत गेले. कोविडची ही लाट काही दिवसांत संपेल आणि आपण पुन्हा नव्याने शाळेत जाऊ असे बालविश्व रंगवून विद्यार्थी बसले होते.

चौकट :

ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाची तयारी

कोरोना संसर्गाची दुसरी लाट प्रभावी दिसत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे ऑनलाइन शिक्षणाची शाळांनी तयारी केली आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम कसा आणि किती वेळ शिकवायचा याचीची रंगीत तालीम केली आहे. कोरोनाचा संसर्ग ओसरला तर मागील वर्षात पाचवी ते बारावीसाठी केलेला ऑफलाइन शिक्षणाचा प्रयोग अवलंबिता येईल का, यावरही विचार सुरू आहे; पण या सर्व प्रयोगांचे भविष्य लसीकरणानंतर ठरणार आहे. मागील वर्षासारखे यंदा धोका पत्करण्याची पालकांची मानसिकता नाही.

शासन निर्णयानंतरच शाळांचा विचार

कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. ही लाट ओसरल्यानंतर शाळांबाबत शासन काय निर्णय घेईल, त्यावर पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुट्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होईल; पण शाळा केव्हा सुरू करणार हे कोरोना महामारीच्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे मत शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक

कोरोना महामारीमुळे मागचे वर्ष ऑनलाइन शिक्षणात गेले. त्यामुळे विद्यार्थी शाळेप्रमाणे या शिक्षणात रमले नाहीत. मुलांना घरी जाऊन शिकविल्याने त्यांच्या अनेक शंकांचे निरसनही झाले. शैक्षणिक वर्ष संपून वरच्या वर्गात गेलेले विद्यार्थी अजूनही फोन करून ऑनलाइन क्लासचा अभ्यास पाठविणार का, असं विचारतात. त्यामुळे यावर्षी शाळा कधी सुरू होते याची आम्हाला उत्सुकता आहे.

- सतेशकुमार माळवे, दहीवडी

सलग वर्षभर घरात बसल्याने मुले कंटाळली आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग परिणामकारक नाही. आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत अभ्यास करण्याचा आनंद त्यांना घेताच येत नाही. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शिकवणे सुरक्षित आहे का, याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. अर्थात महामारीचा संसर्ग किती प्रमाणात घटतोय यावरच हे अवलंबून आहे.

- दीपश्री सुकाळे, पालक

आधी शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा; पण आता शाळेत जावेसे वाटायला लागले. ऑनलाइन शाळेमुळे मित्र भेटत नाहीत. त्यामुळे कधी एकदा शाळेत जातोय असे झालेय. कोरोनामुळे रोज शाळेत जाणे शक्य नसेल तर एक-दोन तासांसाठी शाळेत बोलावून आम्हाला सगळ्यांना भेटू द्यावे असे वाटते.

- एक विद्यार्थी

यंदा पहिलीत प्रवेश घेणारे विद्यार्थी मागील वर्षात मोठा गट व अंगणवाडीतील शिक्षणाला मुकले आहेत. त्यामुळे पहिलीतील त्यांचा प्रवेश उत्सुकतेचा राहणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुटी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार हे अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार हेही अनिश्चितच दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग कितपत राहणार, दुसऱ्या लाटेत मुलांचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांनाही लस देणार का, लस दिली तरीही शाळा सुरू करणार का, याबाबत उत्सुकता आहेच.

Web Title: The children have to go to school ... but the next step is to decide on vaccination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.