मुलं वाचतात चक्क संस्कृतची पुस्तकं!
By admin | Published: July 1, 2016 11:22 PM2016-07-01T23:22:51+5:302016-07-01T23:37:06+5:30
चिमुरडे हात अनुभवताहेत ग्रंथस्पर्श : अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
जावेद खान-- सातारा -केवळ दूरचित्रवाहिन्यांसमोर बसून भावी पिढी घडणार नाही. त्यातच मोबाईल, व्हिडिओ गेमसारखे अनेक माध्यमं त्यांचं लक्ष विचलित करत आहेत. भावी पिढी विचारसंपन्न व्हायची असेल तर तिला ग्रंथवाचनाचे बाळकडूच मिळायला पाहिजे. हाच धागा पकडून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने ‘वर्गग्रंथ’ हा अनोखा उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने चिमुरड्या हातांना ग्रंथस्पर्श लाभत आहे.
प्रभावी शिक्षण हे बलशाली राष्ट्र निर्माण करते, याला अनुसरून येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने गेल्यावर्षीपासून ‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम राबविला आहे. यासंदर्भात माहिती देताना प्राथमिकचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘सध्या टीव्ही, मोबाईलमुळे मुलांची वाचनासंबंधीची आवड कमी होत आहे. मोबाईलवर तासंनतास गेम खेळत बसल्यामुळे मुलांचा शैक्षणिक विकासही खुंटत आहे. त्यांच्यात वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक वर्गात ग्रंथालयांची निर्मिती केली आहे.’
यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांबरोबरच इंग्रजी, मराठी शब्दकोश, ललित लेखन, बालकथा, संतांची साहित्य संपदा, थोरामोठ्यांची चरित्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी दररोज दोन तास विद्यार्थी वाचन करतात. त्यानंतर वाचलेल्या ग्रंथांसंदर्भात चर्चा घडवून आणली जाते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव मिळत आहे. या वाचनामुळे स्पर्धा परीक्षेबरोबर भाषांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होऊ लागली आहे.
‘वर्गग्रंथ’ हा उपक्रम कर्मवीर विद्या प्रबोधनीतर्फे चालविले जात आहे. त्याचे नियोजन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी असते. या उपक्रमात सध्या रयत गुरुकुल सुरू आहे. विविध विषयांवर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल-चाचणी, व्यक्तिमत्त्व विकास, सहशालेय उपक्रम, क्षेत्रभेट, विज्ञान सहलीचे नियोजन अशी अनेक उपक्रम विद्यालय राबवित आहे.
मला वक्ता व्हायचंय...
विद्यालयाने आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ‘मला वक्ता व्हायचंय’ या उपक्रमांतर्गत वक्तृत्वाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आठवड्यातून किमान एक तास मार्गदर्शन केले जाते. त्यांना विविध विषयांवर बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उत्तम वक्त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित दाखविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढणार आहे.
२५ वर्गांमध्ये ३५ ग्रंथ
गेल्यावर्षीपासून सुरू केलेल्या ‘वर्गग्रंथ’ उपक्रम ३५ वर्गांमध्ये सुरू आहे. यामध्ये सुमारे दोनशे पुस्तके ठेवली आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- कमलाकर महामुनी, मुख्याध्यापक.