Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:11 PM2022-01-06T17:11:23+5:302022-01-06T17:16:55+5:30

शिक्षणाच्या आवडीमुळे आपले आई - बाबा ऊस तोडणी करत असताना कोणत्याही खेळात मन न रमवता हातामध्ये थेट पुस्तक, वही व पेन घेऊन स्वतः कॅनॉलचा कट्टा हीच आपली शाळा म्हणून अभ्यास करत होती.

The children of the sugarcane workers engage in study on the canal in Kalgaon Karad Town Satara district | Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

Education : ऑनलाईन ना ऑफलाईन; कालव्याच्या कट्ट्यावर ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

googlenewsNext

जगन्नाथ कुंभार

मसूर : कालगाव (ता. कराड ) येथे जालना येथून ऊस तोडणीसाठी मजुरांची टोळी आली आहे. या टोळीचे ऊस तोडणीचे काम शेतात चालू होते. ऊस तोड करत असलेले मजूर शेताच्या खालच्या टोकाकडे ऊस तोड करत होते. परंतु, या टोळीतील मजुरांची चार मुले हायस्कूलच्या पाठीमागून गेलेल्या कॅनॉलच्या कट्ट्यावर अभ्यास करण्यात मग्न होती. आपले आई - बाबा ऊस तोडणी मजुरी करत आहेत. परंतु आपण शिकून मोठे व्हायचे व आई - बाबांना या मजुरीतून मुक्त करायचे.

कोरोना विषाणूमुळे गत दोन वर्षांपासून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हाती मोबाईल आले. यावरून ऑनलाईन तास होत असल्याने मुले तासनतास मोबाईल घेऊन बसू लागली. पण कॅनॉलच्या कट्ट्यावर बसून शिक्षणाचे धडे घेत असलेल्या या ऊसतोड मजुरांच्या चार मुलांना ना ऑनलाईन शिक्षण ना ऑफलाईन.

शिक्षणाच्या आवडीमुळे आपले आई - बाबा ऊस तोडणी करत असताना कोणत्याही खेळात मन न रमवता हातामध्ये थेट पुस्तक, वही व पेन घेऊन स्वतः कॅनॉलचा कट्टा हीच आपली शाळा म्हणून अभ्यास करत होती. यातील सोनाली कारणे ही मुलगी तिसरीचे शिक्षण घेत आहे, तर साक्षी पवार ही मुलगी पहिलीचे शिक्षण घेत आहे. स्वराज व कान्हा शिंदे हे बालवाडीत जात असल्याचे समजले. तिसरीला शिक्षण घेत असलेली सोनाली ही अन्य मुलांना शिकवत होती.

हंगामी वसतिगृहांची आवश्यकता

सामाजिक संस्थांनी जबाबदारी घेऊन ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या ज्या टोळ्या आहेत, यातील कारखाना कार्यस्थळ सोडून ऊसतोडीसाठी इतरत्र गेलेल्या टोळीतील विद्यार्थ्यांची वसतिगृहाची सोय केल्यास अशी मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. हंगामी शाळेत शिक्षण घेतील व त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल.

सर्व सुख सोयी असताना मुले शिक्षण घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे समाजातील चित्र आहे. परंतु गरिबीची जाण असलेल्या या ऊसतोड मजुरांची मुले कॅनॉलच्या कट्ट्यावर बसून अभ्यास करून इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व तर पटवून देत नाहीत ना. या मुली अशा शिक्षण घेत राहिल्यास एक दिवस त्या उच्च शिक्षित होतील, यात तीळमात्र शंका नाही. - दत्तात्रय यादव (माळी) शेतकरी, कालगाव

Web Title: The children of the sugarcane workers engage in study on the canal in Kalgaon Karad Town Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.