मार्चपासून घरात थांबलेल्या मुलांना शाळेत जायचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:11 AM2021-02-18T05:11:25+5:302021-02-18T05:11:25+5:30
सातारा: कोरोनामुळे मार्चपासून मुले घरात आहेत. शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या. त्यामुळे ...
सातारा: कोरोनामुळे मार्चपासून मुले घरात आहेत. शासनाच्या सूचनेनुसार पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या. त्यामुळे आता पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांनाही शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. मुले पालकांकडे शाळेत पाठविण्यासाठी हट्ट करीत आहेत. परंतु पालक मात्र नकार दर्शवित आहेत.
वास्तविक शासनाच्या सूचनेनुसार पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांचे अध्यापन ऑनलाईन पद्धतीनेच सुरू आहे. रोज एक तास ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे पालकांसमवेतच ही मुले ऑनलाईन वर्गासाठी बसत आहेत. वर्ग संपल्यानंतर पालक मुलांच्या मागे खेळू नको, अभ्यास कर यासारखी सतत भुणभुण करीत असल्याने मुलांना आता प्रत्यक्ष शाळेत जायचे आहे. शाळेत गेल्यानंतर मित्रांची भेट होणार आहे. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे शासनाने परवानगी दिली तरी मुलांना पालक शाळेत पाठविण्यास तयार होणार नाहीत. पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले असले तरी उपस्थितीचे प्रमाण अद्याप ५० टक्केच आहे. सद्यस्थितीत १ ते ४ पर्यंतच्या शाळा जूनपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाची भीती अद्याप पालकांमध्ये आहे.
ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र आई सतत अभ्यास कर म्हणून मागे लागते. किती अभ्यास केला तरी समाधान होत नाही. खेळूही देत नाही. घराबाहेरही पाठवत नाही, त्यामुळे कंटाळा आला आहे.
- स्वरा इंगळे, (पहिली)
माझा दादा शाळेत जातो. त्याची शाळा पूर्वीसारखी जास्त वेळ नाही. परंतु आता मलाही शाळेत जायचे आहे. शाळेत गेल्यावर माझे मित्र मला भेटणार आहेत. शिक्षकही भेटतील.
- यश पवार, (दुसरी)
शाळेचा वर्ग तसेच शिकवणीचा वर्ग ऑनलाईन आहे. त्यामुळे सारखे मोबाईलवर पाहून मला आता कंटाळा आला आहे. डोळेही दुखतात. बाहेर कोरोनाची भीती असल्यामुळे घराबाहेर कोणीही पाठवत नाही. अजून किती दिवस असे कोंडून रहायचे. त्यापेक्षा लवकरात लवकर आमची शाळा सुरू करावी. मी बाबांना मला शाळेत जायचे सांगितले आहे, परंतु ते सध्या तरी शाळेत पाठवणार नसल्याचे सांगतात.
- अन्वी अभिनंदन शीतल मोरे ( तिसरी)
आमच्या शेजारची ताई शाळेत जाते. तिची शाळेत जाण्याची गडबड पाहून मलाही शाळेत जावे वाटत आहे. ताई मास्क बांधूनच घराबाहेर पडते. मीही मास्क लावेन. हाताला सॅनिटायझरही लावेन. परंतु आमची शाळा सुरू करायला हवी आहे. मला वर्गात बसून अभ्यास करायला आवडेल.
- पर्णवी काळे, (चौथी)
एक ते चार वर्गातील मुलांना आरोग्याबाबत फारशी काळजी घेता येणार नाही. त्यामुळे शासनाने जूनपर्यंत तरी प्रथम चार वर्ग सुरू करण्याची घाई करू नये. जूननंतरच निर्णय योग्य राहील.
- विक्रम औंधकर, पालक
अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे परिस्थिती निवळेपर्यंत तरी पहिली ते चौथी पर्यंतची मुले लहान आहेत. त्यामुळे त्यांचे वर्ग तूर्तास तरी सुरू करू नयेत.
- विद्या धुमाळ, पालक
शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक आहेत. वास्तविक पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची आवश्यकता नव्हती. पहिली ते चौथीचे ऑनलाईन वर्ग ठिक आहेत.
- राजेश मोरे, पालक
कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण शून्यावर आलेले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेचा विचार करून पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा जूनपासून सुरू करणेच योग्य राहील.
- कविता वाघ, पालक