मुलांची खेळात मस्ती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:35+5:302021-02-10T04:39:35+5:30
एकंबेच्या घटनेने अस्वस्थता : क्रीडांगणांवर अद्यापही लक्ष देणे गरजेचे लोकमत न्यूज नेटवर्क प्रगती जाधव-पाटील सातारा : कोरोनाच्या कचाट्यात सापडू ...
एकंबेच्या घटनेने अस्वस्थता : क्रीडांगणांवर अद्यापही लक्ष देणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रगती जाधव-पाटील
सातारा : कोरोनाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून आवश्यक ती सर्व काळजी घेऊन पुन्हा एकदा न्यू नॉर्मल आयुष्य सुरू असतानाच, पालकांची चिंता पुन्हा वाढली आहे. सुमारे दहा महिने कोंडून घातलेल्या लेकरांना घराबाहेर मोकळ्या वातावरणात खेळण्यासाठी पालकांनी सोडले. क्रीडांगणावर मुलांची खेळात मस्ती सुरू असताना पालकांच्या मनात मात्र कोरोनाची धास्ती वाढली आहे.
कोरेगाव तालुक्यातील एकंबे येथे कार्यक्रमासाठी बाहेर पडलेल्या निवासी शाळेतील तब्बल ३१ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने एकच गहजब माजला आहे. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण कडी शोधण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू असला तरीही, या घटनेने पालक मात्र पुरते हादरले आहेत. शाळांमध्ये काळजी घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे क्रीडांगणावर कसे लक्ष ठेवावे, या चिंतेने पालक ग्रस्त आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर सक्तीने मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. पण खो-खो, कबड्डी, बॉक्सिंग, कराटे यासारख्या खेळांमध्ये कोविडचे नियम पाळणं अशक्य होतंय. अशा स्थितीत पालकांनी घरी आल्यानंतर मुलांना स्वच्छ अंघोळ करायला लावणं, खेळताना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. खेळायला गेलेल्या मुलांना सर्दी, खोकला असे साधे आजार झाले तरीही तणाव घेऊन पालक रुग्णालयांमध्ये जात आहेत. कोविड तर नाही ना, हा प्रश्न विचारताना पालकांचे चेहरे बघून मुलांनाही धक्का बसतोय, हे पालकांच्या गावीच नाही. प्रत्येक आजार कोरोना नाही, हे पालकांनी लक्षात ठेवावं आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावं, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
चौकट :
१. तपासणीसाठी आग्रह नकोच!
गेल्या काही दिवसांत गारठा चांगलाच वाढला आहे. मकरसंक्रांतीनंतर कमी होणारा गारठा वाढत असल्याने तो आरोग्याला अपायकारक आहे, याचं भान राहत नाही. सर्दी, खोकला म्हणजे कोविड, असं समीकरण पालकांच्या डोक्यात इतकं घट्ट बसलंय की, मूल आजारी पडलं की त्याची कोविड तपासणी करण्याकडेच त्यांचा कल असतो.
२. एक विद्यार्थी अन् ६० तपासण्या
शाळा आणि क्रीडांगणे खुली झाल्याने मुलांचा या परिसरात मुक्त वावर वाढला आहे. शिक्षकांच्या देखरेखीखाली मुलं शाळेत शारीरिक अंतर पाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, क्रीडांगणावर हे शक्य होत नाही. तिथं परस्परांच्या संपर्कात येण्याने मुलांना संसर्गजन्य सर्दीचा त्रास होतो. कोणा पालकांनी अशा स्थितीत आपल्या पाल्याची तपासणी करण्याचा आग्रह धरला, तर त्या एका मुलासाठी किमान अन्य पन्नास जणांची तपासणी आरोग्य यंत्रणेला करावी लागते.
कोट :
गारठ्याच्या दिवसांत सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास होणं स्वाभाविक आहे. प्रत्येक आजार हा कोविड नाही, याचं भान पालकांनी ठेवून वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
- डॉ. प्रताप गोळे, मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा