पाण्याच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू
By admin | Published: February 5, 2016 12:53 AM2016-02-05T00:53:40+5:302016-02-05T00:59:36+5:30
साताऱ्यातील घटना : मृत बालक इमारत बांधकामावरील वॉचमनचा मुलगा
सातारा : कदमबाग परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षांच्या बालकाचा गुरुवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्याचा तो मुलगा होता.
प्रेम महेश माले असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील महेश माले (मूळ रा. त्रिचंद, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हे रोजगारासाठी सहकुटुंब साताऱ्यात राहतात. कदमबाग परिसरात पुष्पदीप अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे ते वॉचमन म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते कामावर रुजू झाले. त्याच इमारतीतील गाळ्यात त्यांचे कुटुंब राहते. जवळच पाण्याची टाकी आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची पत्नी टाकीजवळ कपडे धूत होती. जवळच प्रेम खेळत होता.
कपडे वाळत टाकण्यासाठी त्याची आई टाकीपासून थोडी दूर गेली. ती परतल्यावर प्रेम जागेवर दिसला नाही. तेथे ठेवलेली बादली उपडी पडल्याचे दिसून आल्यानंतर तिने टाकीत पाहिले, तेव्हा प्रेम टाकीत पडल्याचे दिसून आले आणि तिने आक्रोश सुरू केला. आसपासच्या लोकांनी धाव घेऊन प्रेमला टाकीबाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी प्रेम मृत झाल्याचे सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला फौजदार तावरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा प्रेमचा मृतदेह त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.