मिरच्या महागल्याने लाल मसाला झाला तिखट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:22+5:302021-04-08T04:39:22+5:30
वरकुटे-मलवडी : फाल्गुन महिन्यातील उन्हाचा तडाखा वाढल्याने, एकीकडे उन्हापासून वाचण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे कडक उन्हाचा फायदा घेऊन ...
वरकुटे-मलवडी : फाल्गुन महिन्यातील उन्हाचा तडाखा वाढल्याने, एकीकडे उन्हापासून वाचण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे कडक उन्हाचा फायदा घेऊन सहा महिने, वर्षभरासाठी मसाला (चटणी) बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, घाऊक बाजारात मसाल्याच्या पदार्थासह मिरच्यांचे दर भरमसाठ वाढल्याने मसाल्याची खरेदी करताना भरउन्हात गृहिणींची दमछाक होत आहे.
माघ महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला (चटणी) बनविण्याची तयारी सुरू होते. याच कालावधीत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ लाल मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. म्हणून लाल मिरचीसह गरम मसाल्याच्या जिन्नसांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. दरम्यान, लाल मिरचीच्या उत्पादनात झालेली घट आणि इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे यंदा मिरचीच्या दरांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून धने, लवंग, दालचिनी यासारखे जिन्नसही महागले आहेत. त्यामुळे यंदा लाल मसाला गृहिणीसाठी किमतीला चांगलाच तिखट झाला आहे.
माण तालुक्यातील महिलांनी घरगुती पद्धतीने तयार केलेला ‘घाटी मसाला’ चविष्ट असून जास्त दिवस टिकून राहतो. त्यामुळे मुंबई-पुणे येथील कामानिमित्त राहणाऱ्या माणवासूयांची गावातूनच मसाला तयार करून मुंबई-पुण्याला घेऊन जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मसाल्याच्या मिरच्या आणि गरम मसाला खरेदीसाठी महिलांची गर्दी आता वाढू लागली आहे. मसाल्यासाठी कर्नाटकवरून येणारी बेडगी, काश्मिरी, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशमधून येणारी गंटूर आणि महाराष्ट्रातील तेजा मिरचीसह कोल्हापूरची लवंगी मिरची गावोगावच्या किराणा दुकानांसह बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून, सध्या मिरच्यांसह मसाल्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरच्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा बाजारात मिरच्यांची आवक रोडावली असून, दरात वाढ झाली असल्याचा दावा मिरची विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
चौकट :
दरातही वाढ
मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या धणे, खसखस, दगडफूल, लवंग, दालचिनी, तेजपत्ता या जिनसांच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी ७५ रुपये ते १ हजार १२५ रुपये प्रतिकिलोने विकले जाणारे हे जिन्नस यंदा १०० रुपये ते १ हजार ५०० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. मिरच्यांच्या दरवाढीचा परिणाम या जिनसांवर झालेला पाहावयास मिळत आहे.
फोटो : संग्रहित