दर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:20 PM2018-10-17T18:20:47+5:302018-10-17T18:22:36+5:30
खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.
खटाव तालुक्यात अगोदरच पिण्यासाठी पाणी नाही. त्यातच शेतकरी ठिबकच्या माध्यमातून अशा प्रकारची पिके घेत असतात. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांनी मिरची घेतली आहे; पण या मिरचीला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे.
यामुळे मिरचीसाठी केलेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यातच मिरचीसारखी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणले. परिणामी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कमी दरामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोडणीचा खर्चसुद्धा परवडत नाही. आता कोणत्या पिकांकडे वळावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेती अडचणीत येऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
सिमला मिरचीची लागण करण्यासाठी साधरणत: एका एकरास दहा ते अकरा हजार रोपे लागतात. एका रोपाची किंमत दोन रुपये २० पैसे, मलचिंग पेपर, ठिबक सिंचन, लागवडीसाठी मजूर तसेच औषध फवारणी असा मिळून एकरी एक लाखापर्यंत खर्च येतो.
या पिकाला आजच्या बाजारात दहा रुपये दर मिळत आहे. आज एका मजुराला एका दिवसाला ३५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करण्याऐवजी कामाला जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
मिरचीची लागण करण्यास खर्च जास्त आला आहे. त्यातच दराची घसरण झाल्यामुळे तोडणीचे सुद्धा पैसे निघत नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा पिकांच्या संदर्भात शासनाने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
- अरविंद शिंदे,
शेतकरी