चिमणगावचा जरंडेश्वर शुगर मिल्स गळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:26+5:302021-08-01T04:36:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : ईडीच्या कारवाईमुळे यावर्षी चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू राहणार की ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : ईडीच्या कारवाईमुळे यावर्षी चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू राहणार की नाही या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली असून, शनिवारी रोलर पूजनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आला.
माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या तक्रारींच्या सपाट्यानंतर ईडीने जरंडेश्वर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर सर्वपक्षीय नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखाना सुरू रहावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. कारखाना सुरू राहणार की बंद राहणार याविषयी साशंकता होती, मात्र कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरू ठेवण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी तयारी केली होती.
कारखान्याचा यावर्षीचा गळीत निर्विघ्नपणे पार पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. शनिवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी संचालक विजय जगदाळे यांच्या हस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले. यावर्षी २० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात जरंडेश्वर शुगर मिल्सने गाळप, रिकव्हरी आणि दरामध्ये नेहमीच अव्वल स्थान राखले आहे. कोरेगाव-खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त उसाचे गाळप यावेळी केले जाणार आहे, असे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.
फोटो : ३१जरंडेश्वर
जरंडेश्वर साखर कारखान्याचे रोलर पूजन शनिवारी करण्यात आले.