चिमुकल्यांच्या हाती चक्क कोयनेचा पाऊस!
By admin | Published: July 6, 2014 12:26 AM2014-07-06T00:26:31+5:302014-07-06T00:31:44+5:30
कोयनानगरमध्ये पोरखेळ : मुले ओततायत पर्जन्यमापकात पाणी
धीरज कदम, कोयनानगर : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय,’ असा प्रश्न बालगीतातून विचारणाऱ्या चिमुकल्यांनी चक्क पर्जन्यमापकात बाटलीनं पाण्याची धार ओतून मुसळधार पाऊस पडल्याची नोंद करण्याचा चमत्कार केलाय खरा; पण या बाललीलांमुळे चुकीची आकडेवारी नोंद होऊन डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोयना परिसरात पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवरूनच वीजनिर्मितीचं गणित सोडविलं जातं. पाऊस कमी झाला तर राज्यावर वीजटंचाईचं संकट येणार आणि त्याचा फटका उद्योगधंद्यांना बसणार, याची चिंता असल्यामुळे पावसाळ्यात त्यामुळे कोयना धरण क्षेत्रात किती पाऊस झाला, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. साहजिकच कोयना धरण व्यवस्थापनावर पावसाची अचूक आकडेवारी ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे.
पर्जन्यमापन केंद्रांवर गेल्या वर्षीपर्यंत पावसाची नोंद ठेवण्याचे काम पर्जन्यमापक करत होते. पावसाळ्यात हे कर्मचारी स्वत: रोज पडणाऱ्या पावसाची आकडेवारी घेऊन त्याच्या अचूक नोंदी ठेवत असत. मात्र, यंदा त्यांना घरी बसवून कोयना धरण क्षेत्रात येणाऱ्या कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, बामणोली येथील केंद्रांवर अत्याधुनिक पर्जन्यमापन यंत्रणा बसविली आहे. यामुळे हवी तेव्हा पावसाची माहिती मिळत आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. याचाच फायदा लहान मुले उठविताना दिसत आहे.
खेळता-खेळता मुले पर्जन्यमापकाच्या भांड्याजवळ जातात आणि त्यात पाणी ओततात. या प्रकारामुळे पावसाची अचूक आकडेवारी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
सुरक्षेचे तीन तेरा
नवीन पर्जन्यमापन यंत्रणेमुळे हवी तेव्हा पावसाची आकडेवारी मिळत असली तरी त्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पाहावयास मिळत आहे. लहान मुले पर्जन्यमापन यंत्राजवळ जातात आणि खेळता-खेळता त्या यंत्राच्या भांड्यात पाणी ओततात. त्यामुळे अनेकदा पावसाची आकडेवारी चुकीची नोंद होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तासा-तासाला पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवावी लागते. वेळोवेळी येथील पावसाची आकडेवारी विविध शासकीय कार्यालयांना द्यावी लागते. त्यामुळे पर्जन्यमापन हे जबाबदारीचे काम असून अचूक नोंद करण्याची मोठी जबाबदारी असते.