चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:38+5:302021-07-11T04:26:38+5:30

सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. त्यामुळे ही नुसती लुडबूड ...

Chimukalya's holiday mood remains; Forget the study! | चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

googlenewsNext

सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कोविड संसर्गाची बाधा नको म्हणून बच्चे कंपनी शाळेत गेलीच नाही. त्यामुळे ही नुसती लुडबूड घरात राहून चक्क अभ्यास करणंच विसरू लागली आहे. अभ्यास चुकविण्यासाठी एकसे एक भन्नाट कारणं सांगून ऐन शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरीही सुट्टीचा आनंद घेणारी चिमुरडी पालकांना अस्वस्थ करत आहेत.

कोविड काळात ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने पूर्वीसारखं आवरून शाळेत जाणं, वर्गात लक्षपूर्वक शिकवलेलं ऐकणं, गृहपाठ करणं ही सवय मोडली आहे. ऑनलाईन वर्ग सुरू असताना घरात अन्य सदस्यांच्या हालचाली विद्यार्थ्यांना विचलित करत आहेत. त्यामुळे त्यांना शिकवलेलं लक्षात राहात नसल्याचे समोर आले आहे. कोविडचा काळ सरेपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पालकांनी अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

तुला स्वयंपाकात मदत करतो

झाडांना पाणी घालतो

स्कूलचा ग्रुप बंद झाला आता उद्याच अभ्यास करू

शिकवलेलं काही कळलंच नाही

आता थोडासा कंटाळा आलाय

थोडं एन्जॉय करू दे

खेळून आलो की अभ्यास करतो

आत्ता एकदम जाम बोरिंग होतंय

मोबाईलची बॅटरीच चार्ज नाही

मुलांना अक्षर ओळख होईना

कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च २०२०पासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यावेळी छोट्या आणि मोठ्या गटात शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. नेमकं याच दोन वर्गांमध्ये मुलांना अक्षर ओळख आणि हस्ताक्षराचा सराव करण्याचे तंत्र शाळांमध्ये शिकवले जाते. ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग नोंदवला नाही. जे सहभागी झाले, त्यांनाही उभी आणि आडवी रेष सोडली तर फारसं ज्ञान अर्जित करता आलं नाही. ही मुलं पहिली, दुसरीत गेली तरीही त्यांच्या वाचनासह अक्षर ओळखीची ओरड आहे.

पालकांनी घरातच घ्यावी शाळा

मुलांना शिकविण्यासाठी आवश्यक असणारी शास्त्रीय पध्दतीने शिकविण्याची कला पालकांमध्ये नाही. त्यामुळे संयम तुटून मुलांवर ओरडणं, त्यांना शिक्षा करणं हे प्रकार घराघरांमध्ये वाढले आहेत. अभ्यासामुळे आपल्याला मानहानीला सामोरे जावं लागतंय, या धास्तीने मुलांच्या मनात अभ्यासाविषयी अधिक भीती बसली आहे. ही भीती दूर करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञ अतुल शहा यांनी व्यक्त केली.

वर्गनिहाय आकडेवारी

पहिली

दुसरी

तिसरी

चौथी

कोट :

गावाकडे शेतीची कामं सुरू असल्यामुळे मुलांचा अभ्यास घेणं शक्य होत नाही. दिवसभर मुलं घरात बसून टीव्ही बघतात. संध्याकाळी आम्ही कंटाळून घरी आल्यानंतर रात्री त्यांना शिकवणं अशक्य होतंय. शाळा लवकर सुरू होणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

- संतोष नलवडे, विलासपूर

आमच्याकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने दोन्ही मुलांचे ऑनलाईन वर्ग बंदच आहेत. माझं शिक्षणही बेताचं असल्याने त्यांचा चांगला अभ्यास घेणं मला शक्य होत नाही. शेजारपाजारची मोठी मुलं घरात बोलावून त्यांना अभ्यास घ्यायला लावते.

- सुनीता कुऱ्हाडे, भुईंज

Web Title: Chimukalya's holiday mood remains; Forget the study!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.