चिमुकल्यांना भेटले छोटा भीम, ट्यूटी
By admin | Published: June 16, 2015 01:22 AM2015-06-16T01:22:33+5:302015-06-16T01:22:33+5:30
पहिली घंटा वाजली : जिल्ह्यातील ४५ शाळांंमध्ये ‘लोकमत’तर्फे उत्स्फूर्त स्वागत
सातारा : सोमवार, दि. १५ जून... शाळेचा पहिला दिवस... शाळेला जाण्यापूर्वीच हृदयात धडधड अन् काहीचे हिरमुसलेले चेहरे... तरीही आईचा पदर, बाबांचा हात धरून काही चिमुरडे शाळेत दाखल झाले. आयुष्यभर शिक्षणाच्या प्रक्रियेला सोमवारी सुरुवात करणार असल्याने त्यांचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये दाखल झाली ‘लोकमत’ची टीम. ‘लोकमत’ टीमसोबत आलेले ‘छोटा भीम अन् ट्यूटी’ला पाहून सारेच हरकले.नवा कोरा गणवेश, छान दप्तर घेऊन हजारो मुलं सोमवारी शाळांमध्ये दाखल झाली. महिना दीड महिन्यांनंतर जुने मित्र भेटणार म्हणून जुन्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. तर पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन शालेय जीवनाचा श्रीगणेशा करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. गत दीड महिना शांत राहिलेले शाळेचे मैदानेही सोमवारी मुलांच्या किलबिलाटामुळे फुलले होते.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची परंपरा ‘लोकमत’ने यंदाही कायम ठेवली. जिल्ह्यातील ४५ शाळांमध्ये सकाळपासून ‘लोकमत’ची टीम शाळेत गेली होती.
त्याठिकाणी गेल्यानंतर मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षकांना भावी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वर्गावर जाऊन मुलांचे स्वागत केले. ‘लोकमत’तर्फे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्ती प्रमुख सचिन जवळकोटे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)