कळंबे येथे भरधाव टेम्पोच्या धडकेत चिमुकली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:45+5:302021-03-04T05:14:45+5:30
किडगाव : कळंबे, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आकले ते किडगाव मार्गावर भरधाव जात असलेल्या ॲपेरिक्षा टेम्पोने ...
किडगाव : कळंबे, ता. सातारा येथे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आकले ते किडगाव मार्गावर भरधाव जात असलेल्या ॲपेरिक्षा टेम्पोने आजी व दोन नातवंडांना जोरदार धडक दिल्याने दोन वर्षांच्या अन्वी विकास इंदलकर या चिमुरडीचा जागेवरच करुण अंत झाला, तर श्रवण मदन इंदलकर हा तीन वर्षांचा नातू व आजी रुक्मिणी कृष्णा इंदलकर (वय ५५) या गंभीररीत्या जखमी झाल्या.
मंगळवारी रात्री कळंबे गावाच्या बस स्टॉपवर ही दुर्घटना घडली. कृष्णा इंदलकर हे पत्नी व दोन नातवंडांना घेऊन गावामध्ये गेले होते. आकले गावावरून आलेला टेम्पो (क्रमांक एमएच ११ बीएल ०६२३) किडगावच्या दिशेने निघाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेला टेम्पो चालक प्राण काशीनाथ पवार (वय २८) भरधाव टेम्पो चालवत होता. या टेम्पोने आजी व दोन नातवंडांना जोरदार धडक दिली. टेम्पो चालक तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, युवकांनी पाठलाग करून या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
छोट्या अन्वीचे या अपघातात निधन झाल्याने संतप्त
जमावाने-किडगाव कळंबे गावाच्या हद्दीवर टेम्पोला रात्री उशिरा आग लावली.
या घटनेची माहिती कळंबे गावचे पोलीसपाटील विष्णू लोहार यांनी सातारा तालुका पोलीस स्टेशनला दिली. पोलीस निरीक्षक सजन हंकारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व राजू मुलाणी यांनी जागेवर येऊन पाहणी केली.