चिमुरड्यांबरोबरच मोठीही पारंपरिक खेळात हरपली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:55 PM2018-08-12T22:55:40+5:302018-08-12T22:55:46+5:30
सातारा : सिमेंटच्या जंगलात अंगण हरपतंय अन् मोबाईल, कॉम्प्युटरमुळे मातीतले खेळ लुप्त होऊ लागले. या खेळांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने शाहू स्टेडियममध्ये पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांबरोबरच मोठेही खेळात रंगले होते. या खेळात सहभागी होण्याचा मोह वरुणराजालाही आवरला नाही अन् त्याच्या संगतीनंच चिखलात रस्सीखेचचा खेळ रंगला.
सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनने रविवारी आयोजित केलेल्या पारंपरिक खेळात चिमुरड्यांपेक्षा मोठीच मंडळी जास्त रमली. विटी दांडू, भोवरा खेळण्यात पुरुष मंडळी तर महिला झिबल्या खेळताना दिसत होत्या.
कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम, चेस या खेळांमध्ये दंग झालेली आजची पिढी मातीतले खेळच विसरली आहेत. त्यामुळे मातीची नाळ कमी होत चालली आहे. त्यांचा व्यायाम खुंटल्याने शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, मोठ्यांना जुने खेळ खेळण्याची संधी मिळावी म्हणून सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशनतर्फे रविवारी पारंपरिक खेळ आयोजित केले होते.
जुने खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने कधी एकदा या साधनांना हात लावू, असे अनेकांना झाले होते. आवडीचा खेळ ताब्यात घेण्यात व आपण मित्रांना कसे वरचढ होत होतो, हे सोबत आणलेल्या नातवंडांना रंगून सांगतानाही आजोबा दिसत होते. गोट्या, लंगडी, लगोर, भोवरा, विटी-दांडू, टायरगेम, सॅकसेर असे पारंपरिक खेळ खेळताना अनेकजण दिसत होते.
७५ किलोचा भलामोठा भोवरा
यामध्ये ७५ किलोचा भलामोठा भोवरा ठेवण्यात आला होता. अनेकजण तो कुतूहलाने पाहत होते. अनेकांनी तो फिरवण्याचा आनंद घेतला.