दुकानात बंदीचा फलक तरी मुलांकडे चायनीज मांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 10:58 PM2018-08-07T22:58:14+5:302018-08-07T22:58:25+5:30
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पतंग उडविण्यात धम्माल करण्यासाठी मुलांचे लक्ष नागपंचमीकडे लागलेले असते. पतंगासाठी चायनीज मांजा वापरण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे; पण हा मांजा वाहनचालक, पादचाऱ्यांच्या जीवावर उठत आहेत. लोणंद, फलटणमध्ये दोघेजण जखमी झाले. या प्रकारानंतर साताºयातील अनेक दुकानांसमोर ‘चायनीज मांजा मिळत नाही, बंदी आहे,’ असे फलक लागले आहेत. तरीही ते मुलांना मिळतात, हे विशेष.
जिल्ह्यातील अनेक भागांत नागपंचमीला पतंग मोठ्या प्रमाणावर उडविले जातात. पूर्वी यासाठी मांजा घरीच केला जात असायचा, यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू असायची. नेहमीच्या दोºयालाच ट्यूब लाईट, बल्बच्या काचांचा चुरा करून तो खळीतून लावला जायचा. अनेक तास वाळवून त्यापासून मांजा केला जात असायचा. तेव्हाही एकमेकांचे पतंग कापण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची.
बदलत्या बाजारपेठेत पारंपरिक मांजाला पर्याय म्हणून चायनीज मांजा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची विक्री सुरू आहे. ‘चॅवम्याव’ नावानंही ओळखला जात असलेला हा मांजा खूपच धारदार आहे. तसेच तो नायलॉनपासून बनलेला असल्याने त्याचा तिढा बसला तर सोडवणं खूपच अवघड जातं. त्यामुळे लोणंद येथे दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून निघालेले फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील दत्तात्रय किसन आवळे यांच्या गळ्याला मांजाचा फास बसला. काही कळायच्या आत प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्याचवेळी त्यांच्यासोबत मुलगा विकी होता. त्याने तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार मिळाले; पण त्यांच्या गळ्याला आठ टाके पडले. तर सोमवारी सकाळी फलटण-आसू रस्त्यावर कामावरून घराकडे दुचाकीवरून जात असताना राजाळेनजीक ननवरे वस्तीजवळ चायनीज मांजा कापल्याने सुरेश संभाजी जगताप गंभीर जखमी झाले. त्यांना पंधरा टाके पडले आहेत.
जीवघेणा चायनीज मांजावर बंदी आणावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. अशा घटना घडल्या की मांजा काउंटरवरून दूर केला जातो. मांजाला बंदी असल्याचा फलकही झळकला जातो; पण तरीही मुलांच्या हाती हा येतोय कोठून? याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हा मांजा वापरापासून मुलांना पालकांनी परावृत करण्याची गरज आहे.
भाजीची पाटी अन् घरातून विक्रीस
साताºयातील अनेकांनी विक्री बंद केली असली तरी काही जणांकडून छुप्या पध्दतीने विकला जातो. हे मुलांनाही माहिती आहे. घर, भाजी मंडईतील भाजीच्या खाली ठेवून त्याची विक्री केली जाते. त्या ठिकाणी सहज मिळतो, अशी माहिती काही तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.