फलटणमध्ये चायनिज मांजा उठतोय जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:15+5:302021-06-25T04:27:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : पतंग उडविण्यासाठी वापरात येणाऱ्या चायना मांजावर बंदी असतानाही फलटण शहरात चायना मांजाचा सर्रासपणे वापर ...

Chinese cat is on the rise in Phaltan! | फलटणमध्ये चायनिज मांजा उठतोय जीवावर!

फलटणमध्ये चायनिज मांजा उठतोय जीवावर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : पतंग उडविण्यासाठी वापरात येणाऱ्या चायना मांजावर बंदी असतानाही फलटण शहरात चायना मांजाचा सर्रासपणे वापर सुरू आहे. या मांजामुळे अनेक नागरिकांबरोबरच पशुपक्षीदेखील जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि नगरपालिकेने चायना मांजा वापरणारे व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा चायना मांजा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यामुळे पक्ष्यांसह दुचाकीस्वार जखमी होत असून, यापूर्वी फलटण शहरात अनेकांना जखमा झाल्याच्या आणि मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चायना मांजावरील बंदी कागदावरच राहिल्याने हा मांजा जीवावर उठत आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून दिलासा मिळू लागल्याने आणि बंधने हटू लागल्याने शहरातील मैदाने, गच्ची, जवळपासच्या खुल्या जागेमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर गर्दी करून पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. पूर्वी पतंग उडवण्यासाठी साध्या सुती दोऱ्‍याचा वापर केला जात होता. मात्र, हा दोरा तुटत असल्याने आणि स्पर्धेत पतंग कापण्यासाठी आणि आपला पतंग सुरक्षित राहण्यासाठी चायना मांजाचा वापर वाढला. हा दोरा सहजासहजी तुटत नाही. हा दोरा दुचाकीस्वाराच्या गळ्याभोवती अडकल्यास गळा चिरण्याचा धोका असतो. तसेच एखादा पक्षी अडकल्यास त्याची सुटका सहजासहजी होत नाही. चायना मांजावर बंदी आणलेली आहे, तरीही फलटण शहरात चायना मांजाची सर्रासपणे विक्री व वापर सुरू आहे. त्यामुळे पोलीस आणि पालिका प्रशासनाने चायना मांजा वापरणारे व विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट..

नागपंचमीचा सण जवळ आल्यावर मोठ्या प्रमाणात चायना मांजाची विक्री होत असते. या मांजामुळे यापूर्वी शहरात व तालुक्यात अनेक अपघात घडले आहेत. तसेच पशुपक्ष्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. चायना मांजावर बंदी असताना शहरात व तालुक्यात अनेक विक्रेते चायना मांजाची विक्री करतात. त्यामुळे त्याचा वापरही सर्रासपणे होतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

- प्रीतम जगदाळे, शहराध्यक्ष, युवक काँग्रेस, फलटण

कोट..

चायनीज मांजा विक्रेते दुकानदारांना मांजा विक्रीबाबत योग्य त्या सूचना पोलीस प्रशासन देणार असून, लवकरच दुकानदारांची बैठकही घेणार आहे.

- भरत किंद्रे, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे

Web Title: Chinese cat is on the rise in Phaltan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.